वार्ताहर /कडोली
कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा जास्त होत नसल्याने लसीकरण केंद्रावर तोबा गर्दी होत आहे. केदनूर येथे बुधवारी लसीकरण केंद्रावर ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास 10 ते 12 खेडेगावांचा समावेश असूनदेखील या खेडेगावात कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा अत्यल्प होत आहे. त्यामुळे ग्रामस्थ, महिलांची मोठी पंचाईत होत आहे. रोजची मोलमजुरी सोडून लस घेण्यासाठी रांगेत उभे राहणाऱयांना शेवटी लस न घेता माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे. लस घेतल्याशिवाय बाहेरील राज्यात प्रवास करणे वर्ज्य आहे. त्यामुळे दिवसेंदिवस आता लस घेणाऱयांची संख्या वाढत आहे. परंतु, लसींचा पुरवठा कमी होत आहे. परिणामी प्रत्येक लसीकरण केंद्रावर गर्दी वाढत आहे. लसी मिळत नाहीत म्हणून ग्रामस्थांच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. तेव्हा आरोग्य खात्याने याकडे लक्ष देऊन मुबलक लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
केदनूर येथे बुधवारी लसीकरण केंद्राला 200 लसींचा पुरवठा झाला होता. पण लस घेणाऱया नागरिकांची संख्या अधिक होती. त्यामुळे लसीकरण केंद्रावर वादावादीचे प्रकार वाढत आहेत. परिणामी आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱयांवर अधिक ताण पडत आहे. तेव्हा आरोग्य खात्याने लस पुरवठय़ात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.