वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
कोरोना महामारीमुळे मिळालेल्या तीन महिन्यांच्या ब्रेकनंतर प्रथमच खेळणाऱया ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम विजेत्या सोफिया केनिनने सफाईदार प्रदर्शन करीत क्रेडिट वन बँक निमंत्रितांच्या टेनिस स्पर्धेत विजयी सलामी दिली. चार्लस्टनमधील या स्पर्धेत तिने ऍलिसन रिस्केचा सरळ सेट्समध्ये पराभव केला.
21 वर्षीय केनिनने ऍलिसनवर 6-1, 6-1 अशी सहज मात करीत या ठिकाणी होत असलेल्या महिला सांघिक स्पर्धेची सुरुवात केली. तिच्या विजयामुळे बेथनी मॅटेक सँड्सच्या पीस संघाने मॅडिसन कीजच्या काईंडनेस संघावर 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत 16 खेळाडूंनी भाग घेतला आहे तर अत्यंत कमी प्रेक्षकांना प्रवेश देण्यात आला असून त्यात खेळाडूंच्या कुटुंबीयांचाच अधिक भरणा आहे.
कोव्हिड ब्रेकनंतर आता हळूहळू सर्व क्रीडा प्रकारांना सुरुवात होत असून डब्ल्यूटीए खेळाडूंना त्याची तयारी करता यावी यासाठी येथील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिला टेनिस स्पर्धांना 3 ऑगस्टपासून इटलीतील पालेर्मो येथील स्पर्धेने सुरुवात होणार आहे. ब्रेकच्या आधी केनिनने सहा महिला टेनिस स्पर्धा आणि या वर्षाच्या सुरुवातीस फेडरेशन चषक स्पर्धेत भाग घेतला होता. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्यानंतर तिने फ्रान्समधील लियॉन येथील स्पर्धा जिंकली. त्यानंतर कोरोनामुळे टेनिससह सर्वच स्पर्धा लांबणीवर टाकाव्या लागल्याने ती नाराज झाली होती. पण तो जोम तीन महिन्यांच्या ब्रेकनंतरही टिकून असल्याचे तिने येथील सामन्यात दाखवून दिले.