पेरेसची राष्ट्रीय सहकारी कोस्गेई रौप्यपदकाची मानकरी,
केनियाची पेरेस जेपेचिर्चिर हिने शनिवारी महिला मॅरेथॉनचे सुवर्ण संपादन केले. शेवटच्या काही मिनिटात तिने आपलीच राष्ट्रीय सहकारी ब्रिगिड कोस्गेई हिला मात दिली. या इव्हेंटमध्ये तिने येथे देशाला सलग दुसरे सुवर्ण जिंकून दिले.
‘मी ही मॅरेथॉन जिंकू शकते, याचा विश्वास वाटत होता. शेवटच्या काही मिनिटात तर मी आणखी जिद्दीने धावले. पहिली दोन पदके आम्हाला आहेत, याचा आनंदही वेगळाच आहे’, असे पेरेस याप्रसंगी म्हणाली. तिने 2 तास 27 मिनिटे 20 सेंकद वेळेत हा इव्हेंटपूर्ण केला. कोस्गेईपेक्षा ती 16 सेकंदांनी तर सिडेलपेक्षा 26 सेकंदांनी पुढे राहिली. ब्रिगिड कोस्गेईने 2 तास 27 मिनिटे 36 सेकंद वेळेसह रौप्य तर अमेरिकेच्या मॉली सिडेलने 2 तास 27 मिनिटे 46 सेकंद वेळेसह कांस्य जिंकले.
या इव्हेंटमध्ये लागोपाठ दोन सुवर्ण जिंकणाऱया देशांच्या यादीत आता जपानपाठोपाठ केनियाने स्थान संपादन केले. 1984 मध्ये ऑलिम्पिकमध्ये मॅरेथॉन समाविष्ट झाल्यानंतर केनियाच्या खात्यावर आता 7 पदके नेंद आहेत.
‘मला प्रशिक्षण देणाऱया, मार्गदर्शन करणाऱया सर्व संघसहकाऱयांचे मी आभार मानते. त्यांच्या योगदानामुळे मी रौप्य जिंकले आणि माझी सहकारी सुवर्ण जिंकू शकली’, असे रौप्यजेती कोस्गेई म्हणाली.
सिडेल ही या इव्हेंटमध्ये पदक जिंकणारी तिसरी अमेरिकन आहे. यापूर्वी 1984 मध्ये जोआन बेनोईटने सुवर्ण तर 2004 मध्ये डीना कॅस्तोरने कांस्यपदक जिंकले होते. शनिवारी 30 किलोमीटर्स अंतर पार झालेले असताना अमेरिकन धावपटू सॅली चेप्नेगेटिच तर 38 किलोमीटर अंतरापर्यंत कांस्यपदकाची दावेदार मानली जाणारी इस्त्रायलची लोनाह सॅल्पेटर अचानक पिछाडीवर पडली. या शर्यतीत उष्णतेचा फटका बसला असल्याचे सॅलीने येथे नमूद केले.
प्रचंड उष्ण वातावरण असल्याने ही रेस टोकियोतून सॅप्पोरो येथे हलवली गेली आणि रेसची सुरुवात सकाळी 7 ऐवजी 6 वाजता केली गेली. पण, यानंतरही रेस सुरु झाल्यानंतर काही कालावधीत तापमान 26 डिग्री सेल्सियस व त्यानंतर सकाळी 9 च्या दरम्यान ते 30 डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते.