अमेरिकेकडून 1500 दस्तऐवज सार्वजनिक
वृत्तसंस्था /वॉशिंग्टन
अमेरिकेचे माजी अध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांची हत्या अद्याप जगासाठी रहस्य ठरलेली आहे. अमेरिकेच्या द नॅशनल आर्काइव्हने आता बुधवारी तपासावरून 1500 दस्तऐवज सार्वजनिक केले आहेत. केनेडी यांची 22 नोव्हेंबर 1963 रोजी हत्या करण्यात आली होती. केनेडी यांचा मारेकरी ली हार्वे ओसवाल्डने या हत्येच्या दोन महिन्यांपूर्वी रशियन गुप्तचर यंत्रणा केजीबीच्या हस्तकाची भेट घेतली होती अस खुलासा या गुप्त दस्तऐवजांमधून झाला आहे.
केनेडी यांची सोव्हियत संघाकडून हत्या करण्यात येईल, अशी माहिती एका अज्ञाताने ऑस्ट्रेलियातील अमेरिकन दूतावासाच्या अधिकाऱयांना दिली होती असेही अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएच्या मेमोतून समजले आहे. दूरध्वनीवर झालेल्या संभाषणाचा पूर्ण तपशील ऑस्ट्रेलियातून मागविण्यात आला होता. सीआयएला 1962 मध्ये झालेल्या या फोन कॉलसंबंधी कुठलीच माहिती नव्हती.
सोव्हियत दूतावासात होता मारेकरी
या दस्तऐवजांद्वारे केनेडी यांच्या हत्येविषयी नवी माहिती मिळाली नसली तरीही हा वाद अद्याप सुटलेला नाही. या 1500 फाइल्समधून एक बैठक, केनेडी यांच्या हत्येपूर्वी ओसवाल्ड आणि सोव्हियत हेरांमधील संभाषणाचा खुलासा झाला आहे. मेक्सिको सिटीत ट्रेस करण्यात आलेल्या एका फोन कॉलमधून ओसवाल्ड 23 सप्टेंबर रोजी सोव्हियत दूतावासात होता आणि केजीबी अधिकारी वलेरी व्लादिमिरोविच यांना भेटला होता, असे समोर आले आहे.
ओसवाल्डने सोव्हियत दूतावासात 1 ऑक्टोबर रोजी फोन करत स्वतःचे नाव सांगितले होते. सीआयएच्या मेमोमध्ये केजीबी अधिकाऱयाचे उत्तरही देण्यात आले आहे. फोन कॉलविषयी हा मेमो 23 नोव्हेंबर 1963 रोजीचा आहे. त्याच्या दुसऱयाच दिवशी ओसवाल्डवर केनेडी यांच्या हत्येचा आरोप झाला होता. केनेडी यांच्या हत्येच्या दोन दिवसांनी अन्य एका व्यक्तीने ऑस्ट्रेलियातील अमेरिकेच्या नौदल अधिकाऱयाला फोन करून यामागे केजीबीचा हात असल्याचे सांगितले होते.