टोकियो : जपानचा जागतिक अग्रमानांकित बॅडमिंटनपटू केन्टो मोमोटाने स्पर्धात्मक बॅडमिंटनमध्ये लवकरच पुनरागमन करणार असल्याचे बुधवारी जाहीर केले. मायदेशातच ऑलिम्पिक होणार असल्याने तेथे यश मिळविण्यासाठी तो उत्सुक झाला आहे. एका कार अपघातात गंभीर जखमी झाल्यानंतर सुमारे वर्षभरानंतर तो पुनरागमन करणार आहे.
या महिन्यातच टोकियोमध्ये होणाऱया ऑल जपान राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धेतून तो पुनरागमन करणार आहे. त्यानंतर जानेवारीत होणाऱया थायलंड ओपन स्पर्धेत तो भाग घेणार आहे. कार अपघातात त्याच्या डोळय़ाच्या खोबणीला मोठे प्रॅक्चर झाले होते. त्यामुळे त्याची कारकीर्दच संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली होती. ‘पुनरागमन करताना मी नर्व्हस झालो आहे, तरीही मी खेळण्यास आतुर झालोय,’ असे मोमोटा म्हणाला. कौलालंपूरमध्ये मलेशिया मास्टर्स स्पर्धा जिंकल्यानंतर त्याला विमानळाकडे घेऊन जाणाऱया कारला जबरदस्त अपघात झाला होता. त्यात कारचालक ठार झाला तर मोमोटाला गंभीर दुखापत झाली होती. ‘इतक्या दीर्घ काळानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंविरुद्ध खेळताना थोडी अस्वस्थता वाटणे साहजिक आहे. पण मी खेळण्यास उत्सुक झालो आहे,’ असेही तो म्हणाला. गेल्या फेब्रुवारीत त्याच्या डोळय़ाच्या खोबणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली त्यावेळी तो खूप निराश झाला होता. काही काळ त्याची दृष्टीही अधू झाली होती. पण त्यातून तो आता पूर्णपणे सावरला असून त्याने थेट ऑलिम्पिक सुवर्णपदकावरच नजर ठेवली आहे.
ऑलिम्पिक स्पर्धा कोरोना महामारीमुळे लांबणीवर टाकण्यात आली, हे त्याच्यासाठी पथ्यावरच पडले आहे. अन्यथा नियोजित वेळेप्रमाणे स्पर्धा झाली असती तर त्यात तो सहभागी होऊ शकला नसता. गेल्या वर्षी मोमोटाने विक्रमी 11 स्पर्धा जिंकल्या असून राष्ट्रीय स्पर्धा सलग तिसऱयांदा जिंकण्यासाठी तो सज्ज झाला आहे. हा फॉर्म कायम राहील, अशी आशा बाळगत तो बँकॉकला बॅडमिंटन वर्ल्ड टूरमधील स्पर्धेला सुरुवात करणार आहे. लांबणीवर टाकण्यात आलेल्या तीन स्पर्धा येत्या जानेवारीत थायलंडमध्ये लागोपाठ खेळविल्या जाणार आहेत. त्यातील अंतिम स्पर्धा जानेवारीच्या अखेरीस खेळविण्यात येणार आहे.