वृत्तसंस्था / माऊंट माँगनुई
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीतील रविवारी खेळाच्या दुसऱया दिवशी कर्णधार केन विल्यम्सनच्या दमदार शतकामुळे यजमान न्यूझीलंडने पहिल्या डावात 431 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर पाकने दिवसअखेर पहिल्या डावात 1 बाद 30 धावा जमविल्या. कर्णधार विल्यम्सनचे हे कसोटीतील 23 वे शतक असून त्याने टेलर आणि निकोल्स यांच्यासमवेत शतकी भागिदारी नोंदविल्या.
या कसोटीतील रविवारी खेळाच्या दुसऱया दिवशी एक शतक आणि तीन अर्ध शतके नोंदविली गेल्याने न्यूझीलंडची स्थिती अधिक मजबूत झाली आहे. न्यूझीलंडने 3 बाद 222 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरूवात केली. कर्णधार विल्यम्सन आणि निकोल्स यांनी चौथ्या गडय़ासाठी 133 धावांची भागिदारी केली. नसीम शहाने निकोल्सला झेलबाद केले. त्याने 137 चेंडूत 5 चौकारांसह 56 धावा जमविल्या. विल्यम्सनने आपले शतक पूर्ण केले. कसोटीतील त्याचे हे 23 वे शतक असून त्याने खेळाच्या पहिल्या दिवशी रॉस टेलरसमवेत शतकी भागिदारी केली होती. टेलर आणि विल्यम्सन या जोडीमधील ही 10 वी शतकी भागिदारी आहे. विल्यम्सन यासीर शहाच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 297 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 129 धावा जमविल्या. विल्यम्सन बाद झाल्यानंतर वॅटलिंगने 145 चेंडूत 8 चौकारांसह 73 धावा झळकविल्या. जेमिसनने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 32 धावा नोंदविल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 155 षटकांत 431 धावांवर आटोपला. पाकतर्फे शाहीन आफ्रिदीने 4 तर यासीर शहाने 3, मोहम्मद अब्बास, फहीम अश्रफ आणि नसीम शहा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. वॅटलिंगने कसोटीतील आपले 19 वे अर्धशतक झळकविले.
पाकच्या पहिल्या डावाला चांगली सुरूवात झाली नाही. सलामीचा शान मसूद जेमिसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 10 धावा केल्या. अबीद अली 19 तर मोहम्मद अब्बास 0 धावांवर खेळत असून पाकने पहिल्या डावात 20 षटकांत 1 बाद 30 धावा जमविल्या. पाकचा संघ अद्याप 401 धावांनी पिछाडीवर आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत न्यूझीलंडने पाकचा एकतर्फी पराभव करून आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडच्या संघाने अलिकडच्या कालावधीत कसोटीत क्रिकेटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी केली असल्याने आता हा संघ आयसीसीच्या अधिकृत विश्व कसोटी मानांकनात ऑस्ट्रेलियासमवेत 116 मानांकन गुणांसह संयुक्त आघाडीवर आहे.
संक्षिप्त धावफलक
न्यूझीलंड प.डाव 155 षटकांत सर्वबाद 431 (विल्यम्सन 129, वॅटलिंग 73, टेलर 70, निकोल्स 56, जेमिसन 32, सँटनर 19, शाहीन आफ्रिदी 4-109, यासीर शहा 3-113, मोहम्मद अब्बास, फहीम अश्रफ, नसीम शहा प्रत्येकी एक बळी)., पाक प. डाव 20 षटकांत 1 बाद 30 (शान मसूद 10, अबीद अली खेळत आहे 19, मोहम्मद अब्बास खेळत आहे 0, जेमिसन 1-5).