डेव्हिड वॉर्नरला खराब प्रदर्शनामुळे डच्चू, हैदराबादची आज राजस्थानविरुद्ध लढत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सनरायजर्स हैदराबादने खराब प्रदर्शन करत आलेल्या डेव्हिड वॉर्नरला कर्णधारपदावरुन डच्चू दिला असून केन विल्यम्सनची नवा कर्णधार म्हणून वर्णी लावली आहे. केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखाली हैदराबादचा संघ आज (दि. 2) दिवसभरातील पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला सामोरे जाईल. दुपारी 3.30 वाजता ही लढत खेळवली जाणार आहे.
हैदराबादचा संघ सध्या सातत्याने झगडत असून मागील 6 पैकी 5 सामन्यात त्यांना पराभव पत्करावे लागले आहेत. कर्णधार डेव्हिड वॉर्नर संघाकडून अपेक्षित कामगिरी करवून घेत नाही, ही प्रँचायझीसमोरील मुख्य चिंता होती. त्या पार्श्वभूमीवर, त्यांनी कर्णधार हटवण्याचा निर्णय घेतला. वॉर्नरने मागील 6 सामन्यात अनुक्रमे 3, 54, 36, 37, 6, 57 अशा अनुक्रमे योगदान दिले असून येथे अंतिम एकादशमधूनही त्याला वगळण्याचे संकेत हैदराबाद व्यवस्थापनाने दिले आहेत.
हैदराबादला मागील सलग दोन लढतीत पराभव पत्करावे लागले असून यात चेन्नई सुपरकिंग्सविरुद्धच्या सुपरओव्हरमधील अपयशाचा प्राधान्याने समावेश आहे. हैदराबादचा संघ वॉर्नर, बेअरस्टो, मनीष पांडे व विल्यम्सन या आघाडीवीरांवरच अधिक अवलंबून असून आता वॉर्नरला वगळले गेल्यास त्याची जागा जेसॉन होल्डर घेणे अपेक्षित आहे. त्यांच्या मध्यफळीत एकही भक्कम फलंदाज नाही, ही देखील आणखी एक चिंता आहे.
जॉनी बेअरस्टो खराब फॉर्ममध्ये
या संघातील इंग्लिशमन जॉनी बेअरस्टोला झगडत रहावे लागले असून विल्यम्सन केवळ 3 सामन्यात खेळला आहे. नाबाद 66 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. हैदराबादचे सलामीवीर अपयशी ठरल्यास विल्यम्सन व मनीष पांडे यांच्यावरच मुख्य जबाबदारी पडत आली आहे. उत्तम दर्जाचे भारतीय खेळाडू उपलब्ध नाहीत, याचीही हैदराबादला मोठी किंमत मोजावी लागत आहे. गोलंदाजीत अफगाणिस्तानच्या रशीद खानवर हा संघ बराच अवलंबून आहे. रशीदने 6 सामन्यात 9 बळी घेतले. पण, अन्य सहकारी गोलंदाजांची त्याला योग्य साथ लाभलेली नाही.
भारताचा अनुभवी मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारला 4 सामन्यात 3 बळी घेता आले असून मागील 2 लढतीत तो खेळू शकला नाही. पंजाब किंग्सविरुद्ध त्याला किरकोळ वेदना जाणवल्या होत्या.
राजस्थानसमोर आव्हानांचा डोंगर
दुसरीकडे, राजस्थानच्या कामगिरीत सातत्य नाही, ही त्यांची चिंता आहे. त्यांनी मुंबईविरुद्ध मागील लढतीत 4 बाद 171 धावा केल्या. मात्र, गोलंदाजीने त्यांचा घात केला. जोफ्रा आर्चर व बेन स्टोक्स हे विदेशी खेळाडू संघाबाहेर गेल्याने याचा राजस्थानला फटका बसला आहे. या संघातील स्टार फलंदाज जोस बटलरला 6 सामन्यात अद्याप एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही.
प्रतिस्पर्धी संघ
राजस्थान रॉयल्स ः संजू सॅमसन (कर्णधार व यष्टीरक्षक), जोस बटलर (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, अनुज रावत, रियान पराग, डेव्हिड मिलर, राहुल तेवातिया, महिपाल लोमरोर, श्रेयस गोपाल, मयांक मार्कंडे, जयदेव उनादकट, कार्तिक त्यागी, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, मुस्तफिजूर रहमान, चेतन साकरिया, केसी करिअप्पा, कुलदीप यादव, आकाश सिंग.
सनरायजर्स हैदराबाद ः केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), मनीष पांडे, श्रीवत्स गोस्वामी (यष्टीरक्षक), वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), प्रियम गर्ग, विजय शंकर, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, विराट सिंग, जेसॉन होल्डर, मोहम्मद अहमद, सिद्धार्थ कौल, बसिल थम्पी, जगदीश सुचित, केदार जाधव, मुजीब-उर-रहमान.
सामन्याची वेळ ः दुपारी 3.30 वा.