वार्ताहर /केपे
केपे मतदारसंघातून येणाऱया विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची उमेदवारी द्यावी असा दावा आपण करणार असून पक्षाने उमेदवारी दिली, तर जरूर निवडणूक लढवू, असे माजी नगराध्यक्ष राऊल पेरेरा यांनी केपे येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जेव्हा केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी अन्य नऊ काँग्रेस आमदारांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा त्यांच्यासोबत केपे काँग्रसचे गट अध्यक्ष खुशाली वेळीप व इतर सर्व भाजपात सामील झाले. त्यावेळी केपेत काँग्रेस जवळपास संपल्यासारखीच होती. तेव्हा आपण गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर चोडणकर केपेत आले व मतदारसंघात फिरले. तेव्हा लोकांकडून चांगला पाठिंबा मिळत असल्याने त्यांनी ख्रि. मानुएल कुलासो यांच्याशी संपर्क केला व आपल्याला कसल्याच पदाची इच्छा नसल्याने कुलासो यांना केपे काँग्रेसचे अध्यक्ष करण्यात आले, असे पेरेरा म्हणाले.
गेल्या दहा वर्षांपासून आपण काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून काम करत काँग्रेसचे कार्य पुढे नेत आहे. गेल्या अनेक वर्षांचे कार्य पाहिले, तर पक्षाने आपल्यालाच तिकीट द्यायला हवी, असे पेरेरा म्हणाले. तसेच येणाऱया 10 ते 15 दिवसांत आपली योजना आपण सर्वांसमोर ठेवेन व 2022 ची निवडणूक लढवेन. जर पक्षाने तिकीट नाकारली, तर कार्यकर्त्यांशी बोलणी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्यासंबंधी विचार केला जाईल. आपण यापूर्वीही विधानसभा निवडणूक लढवली असल्याने सर्व भागांशी आपला संपर्क आहे. आज अनेक जण दावे करत असले, तरी जेव्हा कवळेकर भाजपमय झाले तेव्हा पक्षबांधणी करण्यासाठी आपण पुढाकार घेतला होता, असे त्यांनी सांगितले.
पेरेरा यांनी काँग्रेस उमेदवारीवर दावा केल्याने केपेतून काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले एल्टन डिकॉस्ता यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. केपे मतदारसंघात कवळेकर भाजपात गेल्याने भाजपाच्या उमेदवारीकरिता इच्छुक असलेल्यांची संख्या तीनवर गेली आहे. मात्र काँग्रेस पक्षात डिकॉस्ता वगळता आणखी कोणी नाही असे चित्र असताना पेरेरा यांनी दावा केल्याने डिकॉस्ता यांच्यासमोर आव्हान उभे झाले आहे. येणाऱया दिवसांत आणखी किती इच्छुक उमेदवार काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवण्याकरिता दावा करतात ते पाहण्यासारखे आहे.