वार्ताहर / केपे
केपे पालिकेत नगराध्यक्ष निवड होऊन दीड महिना उलटलेला नाही. मात्र काँग्रेस पक्षाचे चार नगरसेवक आपल्या प्रभागात मान्सूनपूर्व गटार स्वच्छता व रस्त्याच्या बाजूची झाडे कापणे व इतर कामे होत नसल्याचा मुद्दा घेऊन केपेतील काँग्रेस नेते एल्टन डिकॉस्ता यांच्यासोबत पालिका नगराध्यक्षांच्या भेटीस शुक्रवारी आले. मात्र नगराध्यक्षा नसल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.
केपे पालिकेत भाजपची सत्ता असून मान्सूनपूर्व कामे होत नसल्याचा व विश्वासातच घेतले जात नसल्याचा दावा काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी केल्याने केपेतील राजकारण आतापासून तापू लागल्याचे दिसत आहे. चार नगरसेवकांचे बळ असल्याने काँग्रेस पालिकेत काही प्रमाणात आपला दबदबा कायम ठेवून आहे. याची जाणीव काँग्रेस नेत्यांना आहे व पालिकेत आपली ताकद वाढवण्याच्या हेतूने काँग्रेस आपल्या परीने काम करत असल्याचे दिसत आहे.
यासंदर्भात प्रभाग 11 च्या नगरसेविका आलिंदा लाफादो यांनी सागितले की, गेल्या दीड महिन्यात आमची कोणतीच कामे झालेली नसून गटार स्वच्छता व रस्त्याच्या बाजूची झाडे कापण्यासाठी एकही कामगार दिलेला नाही. असे का करतात हे माहिती नाही. पाऊस सुरू झाला असून लोक आम्हाला विचारतात. यासंबंधी आम्ही चारही नगरसेवकांनी लेखी निवेदन दिले आहे, असे त्यांनी सांगितले. नगरसेविका नंदिता प्रभुदेसाई यांनी सांगितले की, आम्ही बैठकीतही विचारले होते. त्यावेळी सोमवारपर्यंत कामगार पाठवले जातील असे सांगितले होते. मात्र अजून कामगार पोहोचलेले नाहीत. आता आम्ही नगराध्यक्षांना भेटण्यास आलो, तर नगराध्यक्षा व मुख्याधिकारीही पालिकेत नाहीत.
जेकिना डायस यांनी सांगितले की, बैठकीत आम्हाला सांगितले होते की, कामगार पाठवले जातील. मात्र अजून पाठवलेले नाहीत. यासंदर्भात लोक आम्हाला विचारतात. एल्टन डिकॉस्ता यांनी सांगितले की, स्वपक्षीयांची कामे आधी करायची असल्यास करा, त्यानंतर तरी विरोधकांची कामे करावीत. कामेच न करणे म्हणजे हा भेदभाव झाला. नगराध्यक्षा या सर्व 13 प्रभागांच्या असतात. हा या पक्षाचा, तो त्या पक्षाचा असा भेदभाव होता कामा नये. आम्ही आगावू वेळ घेतलेली नसल्याकारणाने कदाचित नगराध्यक्षा भेटू शकल्या नसतील. मात्र यापुढे कामे करताना असा भेदभाव होऊ नये. प्रत्येक प्रभागाच्या समस्या संबंधित नगरसेवकांना जास्त माहिती असतात. सर्वांना एकत्र घेऊन गेल्यास पालिकेचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, असे डिकॉस्ता यांनी सांगितले.
नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांची या वार्ताहराने नंतर भेट घेतली असता त्यांनी सांगितले की, प्रभागात कामे चालू असून ती पाहण्यास आपण गेले होते. मात्र गटाराची कामे पूर्ण झाली असून काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूची झाडे कापण्याचे काम चालू आहे.