वार्ताहर/ केपे
केपे मतदारसंघातून 25 रोजी दोन अर्ज दाखल करण्यात आले असून यात चंद्रकांत (बाबू) कवळेकर यांनी भाजप उमेदवारीवर, तर विशाल देसाई यांनी आरजीतर्फे अर्ज सादर केला आहे. कवळेकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असून यापूर्वी ते केपे मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे चार वेळा विजयी झाले आहेत. काँग्रेस सोडून भाजपात दाखल झाल्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद व इतर महत्त्वाची खाती मिळाली होती.
कवळेकर भाजपतर्फे पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून केपे मतदारसंघात यामुळे भाजपला विजयाची संधी मिळाली आहे. भाजप या मतदारसंघात कधीच जिंकलेला नाही. कवळेकर यांनी अर्ज दाखल केल्यानंतर बोलताना आजपर्यंत जेवढय़ा निवडणुका लढवल्या त्यापेक्षा जास्त मतांनी लोक मला या नि˜ाडणुकीत जिंकून देतील, असा विश्वास व्यक्त केला.
सर्व कार्यकर्त्यांची सदैव साथ मिळाली असून कार्यकर्त्यांमधे वाढ झाली आहे. मी भाजपात दाखल झाल्यानंतर माझे जुने कार्यकते व भाजपातील कार्यकर्ते या सर्वांनी एकसंध राहून काम केले आहे. मी भाजपात प्रवेश केल्यानंतर जिल्हा पंचायत निवडणुकीत चारही मतदारसंघांतून सदस्य निवडून आले तसेच पालिका निवडणुकीतही विजय मिळवला, असे कवळेकर यांनी सागितले. यावेळी नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, जि. पं. सदस्य खुशाली वेळीप, सिद्धार्थ गावस देसाई, नगरसेवक दयेश नाईक, बाबल कवळेकर, एव्हांजेलिस्ट डिकॉस्ता व इतर कार्यकर्ते मोठय़ा प्रमाणात हजर होते.