माजी नगराध्यक्ष राऊल पेरेरा यांच्याकडून पवित्रा स्पष्ट
वार्ताहर /केपे
केपेतून येणारी विधानसभा निवडणूक आपण नक्कीच लढवणार व कोणत्या पक्षातून लढवावी याविषयी कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. एल्टन डिकॉस्ता हे तिसऱया स्थानावर असतील, असे केपेचे माजी नगराध्यक्ष राऊल पेरेरा यांनी केपे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सागितले.
जेव्हा स्थानिक आमदार चंद्रकांत कवळेकर हे भाजपवासी झाले तेव्हा त्यांच्या पाठोपाठ संपूर्ण केपे काँग्रेस गटही भाजपात गेला. त्यावेळी काँग्रेसमध्ये कोणीही नव्हते. तेव्हा आपण गिरीश चोडणकर यांच्याशी संपर्क साधून त्यानंतर संपूर्ण मतदारसंघाचा दौरा केला. त्यानंतर काँग्रेस हाऊसमध्ये बैठक घेतली गेली व स्व. मानुएल कुलासो यांना केपे गट अध्यक्ष बनविले जाऊन काँग्रेसचे कार्य केपेत परत सुरू झाले. तसेच आपल्याला राज्य पातळीवरील समितीवर नेमण्यात येईल व ती फाईल दिल्लीत पाठवली असल्याचे चोडणकर यांनी जाहीर केले होते, असे पेरेरा यांनी सांगितले.
मात्र ज्या पद्धतीने काही दिवसांपूर्वी एल्टन डिकॉस्ता यांनी काँग्रेसचे तिकीट त्यांनाच मिळेल असा दावा केला आहे ते पाहता काँग्रेस पक्षाने तिकीट विकल्यात जमा आहे हे स्पष्ट होते. कारण काही वर्षांपूर्वी आपण काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर नि˜ाढणूक लढवली होती. तेव्हा अवघ्या 139 मतांनी आपण पराभूत झालो होतो. तरीही दुसऱया वेळी तिकीट आपल्याला न देता लुईझिन फालेरो यांनी उमेदवारी कवळेकर यांना विकली होती. त्यानंतर आपण राष्ट्रवादीवर निवडणूक लढवली व पुन्हा काँग्रेसमध्ये आलो आणि कवळेकर यांच्याकरिता राहिलो, असे पेरेरा म्हणाले.
आता कवळेकर हे भाजपवासी झाल्याने काँग्रेस उमेदवारी खुली झाली आहे. मात्र सुमारे 8 महिन्यांपूर्वी काँग्रेस पक्षात आलेले एल्टन डिकॉस्ता हे काँग्रेस तिकिटावर दावा करतात त्यावरून काँग्रेसचे तिकीट विकल्यात जमा असल्याचे दिसत आहे. निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांची कदर केली जात नाही, असे ते म्हणाले.
आगोंद परिसर हा केपे मतदारसंघात येत नसून खोल पंचायत येते. तसेच पारोडा नव्हे, अवडे-कोठंबी पंचायतीचा केपे मतदारसंघात समावेश होतो. मतदारसंघाची सीमाच एल्टन यांना माहिती नाही, अशी टीका पेरेरा यांनी केली. येणारी निवडणूक आपण नक्कीच लढवेन, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसची तिकीट मिळाली नाही, तर कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढाल असे विचारले असता अनेक पक्ष संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र एका प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, आप हा वाढणारा पक्ष असून काँग्रेस आता वृद्ध झाली आहे. यावरून पेरेरा यांचा कल आपच्या दिशेने असल्याचे स्पष्ट होते.