वार्ताहर / केपे
राज्य निवडणूक आयोगाने पाच पालिकांच्या निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 48 तासांचा वाढीव अवधी दिल्यानंतर शुक्रवारी केपे पालिकेच्या 13 प्रभागांतून 39 अर्ज सादर करण्यात आले. आतापर्यंत 44 अर्ज दाखल झाले आहेत. शनिवारपर्यंत केपे पालिकेतून 5 अर्ज दाखल झाले होते.
शुक्रवारी सकाळपासून केपे उपजिल्हाधिकारी कार्यालयात केपेतील उमेदवार व त्यांच्या सर्मथकांची गर्दी होती. दुसऱया बाजूने कुडचडे पालिकेतील उमेदवारांच्या अर्जांची छाननी असल्याने तेथील उमेदवारांचीही गर्दी दिसून आली. केपे पालिकेतून शुक्रवारी मावळते नगराध्यक्ष दयेश नाईक, मावळते उपनगराध्यक्ष चेतन हळदणकर, माजी नगरसेविका कायतानी फर्नांडिस, माजी नगरसेवक फिलू डिकॉस्ता, दिपाली नाईकसमवेत अनेक नवीन उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.
प्रभाग 1 मधून एक, 2 मधून एक, 3 मधून एक, 4 मधून सहा अर्ज, 5 मधून दोन, 7 मधून तीन अर्ज, 8 मधून 1, 10 मधून पाच अर्ज, 11 मधून दोन अर्ज, 12 मधून सर्वाधिक सात अर्ज, तर 13 मधून तीन अर्ज दाखल झाले आहेत. तर प्रभाग 9 मधून अजून कोणीच अर्ज सादर केलेला नाही. 33 उमेदवारांनी अर्ज केले आहेत, तर काही जणांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. बहुतेक मावळत्या नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.