प्रतिनिधी/ पणजी
केपे मतदारसंघात स्थानिक पालिका राजकारणात गत सुमारे 35 वर्षांपासून सक्रिय असलेले माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते राहूल परेरा यांनी शनिवारी आपल्या समर्थकांसह आम आदमी पक्षात प्रवेश केला. काँग्रेस आणि भाजप या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे लोकांना आता त्यात स्वारस्य राहिले नाही, अशावेळी आम्हाला आम आदमी पक्षात आशेचा किरण दिसला, असे प्रतिपादन नंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना परेरा यांनी केले. आता तर केपेत काँग्रेसचे अस्तित्व संपल्यातच जमा झाले आहे, असेही ते म्हणाले.
पणजीत आपच्या मुख्यालयात आयोजित या प्रवेश सोहळ्यात आपचे गोवा संयोजक राहूल म्हांबरे यांनी त्यांना रितसर प्रवेश दिला. त्यांच्या प्रवेशाने केपेत आपची बाजू अधिक भक्कम झाली आहे, असे यावेळी बोलताना म्हांबरे यांनी सांगितले. व्यासपीठावर गिलारियो फर्नांडीस, केपेच्या प्रभारी पेट्रिशिया फर्नांडीस आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. 1986 मध्ये सर्वप्रथम नगरसेवक बनलेल्या परेरा यांनी 2018 मध्ये नगराध्यक्षपद भूषविले आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकांना मदत आणि रेशन वितरणाच्या वेळी आपच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत पाहून आपण प्रभावित झालो व त्यातूनच पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, असे परेरा म्हणाले. सध्या राज्यात आम आदमी पार्टी मजबूत होत असून अनेक नेते आणि सामाजिक कार्यकर्ते मोठय़ा संख्येने पक्षात सामिल होत आहेत.
केपेचे आमदार बाबू कवळेकर यांनी काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळविला परंतु सत्तेच्या लालसेपोटी भाजपात प्रवेश केला. केपेकरांचा विश्वासघात केला. यात काँग्रेसचीही तेवढीच चूक आहे. या पक्षात सध्या निष्ठावंतांनाही किंमत राहिलेली नाही, असा आरोप परेरा यांनी केला.
परेरा यांच्या प्रवेशामुळे केपेत आप अधिक बळकट होईल, असा विश्वास पेट्रिसिया फर्नांडीस यांनी व्यक्त केला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत केपेतील आणखीही लोक आपमध्ये प्रवेश करतील, असेही त्या म्हणाल्या.
आम आदमी पार्टीने राज्यात वीज विषय घेऊन आंदोलन सुरू केले, तेव्हा पेडणेपासून काणकोणपर्यंत सर्व स्तरांवर पक्षाला भरीव लोकसंपर्क आणि प्रतिसाद मिळत आहे. केपे भागातही पक्षाची बाजू भक्कम बनू लागली आहे. वीज आंदोलनात आतापर्यंत सुमारे दोन लाख लोकांनी नोंदणी केली आहे. जनतेची लूट करणाऱया विद्यमान सरकारला लोक कंटाळले आहेत. परिणामस्वरूप लोक आपकडे आशेने पहात आहेत. गोव्यात आप वेगाने वाढत आहे, असे संयोजक म्हांबरे यांनी सांगितले.