प्रायोगिक तत्त्वावर 16 स्वयंसाहाय्य गटांना प्रत्येकी 1 हजार रोपांचे वितरण, दसरा–दिवाळीच्या वेळी फुले उपलब्ध होणार
प्रतिनिधी / सांगे
गोव्यात फुलोत्पादनाला खूप वाव असून मागणीही बरीच आहे. त्यातच झेंडूच्या फुलांना तर भरपूर मागणी आहे. कृषी खात्याकडे झेंडूची लागवड करण्यासाठी हेक्टरी 60 हजार रुपये सब्सिडी देणारी योजना आहे. पण शेतकरी पुढे येत नाहीत. त्यामुळे व झेंडू हे नगदी पीक असल्याने शेतकऱयांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने केपेच्या विभागीय कृषी कार्यालयाकडून यंदा 16 स्वयंसाहाय्य गटांना झेंडू फुलांची प्रत्येकी 1 हजार रोपे प्रायोगिक तत्त्वावर देण्यात आली आहेत. येत्या दसरा व दिवाळी सणांच्या काळात ही झेंडूची फुले बाजारात उपलब्ध होतील, अशी माहिती केपेचे विभागीय कृषी अधिकारी संदेश राऊत देसाई यांनी दिली.
शेतकरी आत्मनिर्भर बनला पाहिजे हा यामागचा उद्देश आहे. तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी शेतीमध्ये युवक व युवतींनी उतरावे यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. दसरा व दिवाळीला मोठय़ा प्रमाणावर झेंडूची फुले लागतात. तसेच सजावटीकरिता झेंडूची फुले सर्रास वापरली जातात. गोव्यात या फुलांना प्रचंड मागणी आहे. विशेषतः कर्नाटक व महाराष्ट्रातून या फुलांची आयात केली जाते. साधारणपणे दोन महिन्यांत येणारे हे पीक आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
सांगलीतून आणली रोपे
केपेच्या विभागीय कृषी कार्यालयाने पुढाकार घेऊन यंदा 16 स्वयंसाहाय्य गटांना मिळून झेंडूच्या एकूण 16 हजार रोपांचे मोफत वितरण केले आहे. त्यामुळे एकूण 1.60 हेक्टर क्षेत्रात झेंडूची लागवड झालेली आहे. प्रायोगिक तत्त्वावर सध्या ही लागवड केली असून पुढे ती वाढविण्यात येणार आहे. सांगली येथील रोपवाटिकेतून ’कलकत्ता’ नामक जातीची ही रोपे आणलेली असून त्यांची लागवड केल्यास महिना होत आला आहे.
शेतकऱयांकडून उत्स्फूर्त दाद
मुळात या भागातील शेतकरी डोंगरी भाजी व मिरचीची लागवड करत आलेले असून त्या बागेमध्ये किरकोळ प्रमाणात झेंडूच्या स्थानिक जातीच्या रोपांची लागवड केली जात असे. मात्र व्यावसायिक तत्त्वावर फारशी लागवड होत नसे. केपे कृषी कार्यालयाच्या या प्रयोगाला शेतकऱयांनी उत्स्फूर्त दाद दिली असून कोरोनामुळे रोपे आणण्यास थोडा उशीर झाला. आणखी काही स्वयंसाहाय्य गट झेंडूच्या लागवडीत उतरण्यास तयार होते, असे राऊत देसाई यांनी सांगितले.
गेल्या वर्षीचा प्रयोग यशस्वी
गेल्या वर्षी केपेतील 5 स्वयंसाहाय्य गटांना प्रत्येकी 1 हजार याप्रमाणे एकूण 5 हजार रोपांचे वितरण करण्यात आले होते. त्याचा उत्तम परिणाम दिसून आला. सुमारे 25 ते 30 हजार रुपयांचे उत्पन्न या स्वयंसाहाय्य गटांनी घेतल्याचे वृत्त आहे. कमी कालावधीत उत्पन्न देणारे झेंडू हे पीक असून शेतकऱयांना ते लाभदायक ठरणारे आहे. आपल्याकडे स्थानिक झेंडू फुलांच्या माळांना दसरा व दिवाळीच्या वेळी चांगली मागणी असते. ज्या शेतकऱयांना झेंडू फुलांची लागवड करायची आहे त्यांना कृषी खात्याकडून रोपे आणून पुरविण्याची सोय केली जाऊ शकते. एका रोपाची किंमत 3 रुपये अशी आहे, असे राऊत देसाई यांनी सांगितले.
यामुळे महिलांच्या हातामध्ये झेंडू फुलांची विक्री करून चार पैसे येतील. शक्मयतो माळा बनवून विक्री करावी. पिवळय़ा व केसरी रंगांची तसेच मध्यम आकाराची फुले यंदा उपलब्ध होणार आहेत. याचा आनंद येणाऱया दसरा व दिवाळीच्या वेळी घेता येणार आहे. ज्या स्वयंसाहाय्य गटांना रोपे देण्यात आली होती त्यांच्या लागवडीची पाहणी नुकतीच कृषी अधिकाऱयांनी केली असून लागवड उत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.