मराठी विभागातर्फे आयोजन : सध्याच्या काळात टंकलेखन येणे गरजेचे : भांगी
प्रतिनिधी /केपे
कला, विज्ञान आणि वाणिज्य शासकीय हाविद्यालय केपे येथील मराठी विभागातर्फे प्रकल्पकार्यामध्ये संगणकाचा वापर (मराठी देवनागरी टंकलेखनाच्या अनुषंगाने) या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत गोवा विद्यापीठातील हिंदी विभागातील साहाय्यक अधिव्याख्याता प्रा. आदित्य सिनाय भांगी यांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात संगणकावर टंकलेखन येणे गरजेचे आहे, हे सांगतानाच त्यांनी मराठीत कोणकोणत्या पद्धतीने संगणकावर टंकलेखन करता येऊ शकते, याचे प्रात्यक्षिक पीपीटी सादरीकरणाच्याद्वारे दाखवले. प्रमाणभाषेत नेहमी चुकणाऱया शब्दांची उदाहरणे देऊन प्रमाणभाषेत कसे लेखन करावे याचेही मार्गदर्शन त्यांनी केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉयदीप भट्टाचार्य, विभागप्रमुख प्रा. सारिका आडविलकर मंचावर उपस्थित होते.
प्रास्ताविकात मराठी विभागप्रमुख सारिका आडविलकर म्हणाल्या की, मराठी विभाग सातत्याने वेगवेगळय़ा उपक्रमामध्ये अग्रेसर असतो. त्याचाच एक भाग म्हणून प्रकल्प कार्यामध्ये संगणकाचा वापर या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. यावेळी समारोप सत्रात कार्यशाळेविषयी आकृती नाईक व मंजिता देसाई या विद्यार्थिंनीनी मनोगते व्यक्त केली. सूत्रसंचालन प्रा.डॉ. जयप्रभू कांबळे यांनी केले. आभार प्रा.कैलास शेटकर यांनी मांडले. यावेळी प्रा.पूजा गावकर, प्रा.निकिता नाईक गावकर उपस्थित होत्या.
महाविद्यालयाच्या गुणवत्तेत वाढ : भट्टाचार्य
मराठी विभागाने राबविलेल्या या उपक्रमामुळे महाविद्यालयातील मराठीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असून महाविद्यालयाच्या गुणवत्तेत वाढ होणार आहे. मराठी विभागाने यापुढेही कमी मुदतीचे प्रमाणपत्र कोर्स महाविद्यालयात सुरू करावेत, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जॉयदीप भट्टाचार्य यांनी केले.