प्रतिनिधी / कोल्हापूर
खासगी क्लासेस सुरू करण्यास सशर्त परवानगी देण्याच्या मागणीकडे कोल्हापूर जिल्हा प्रायव्हेट क्लासेस टिचर्स असोसिएशनने (केप्टा) अनोखे आंदोलन करून जिल्हा प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खासगी क्लास सुरू करण्यास बंदी आहे. त्यामुळे जिल्हय़ातील शेकडो खासगी क्लास आणि त्यात शिकविणारे शिक्षक आर्थिक अडचणीत आले आहेत. शनिवारी केप्टाच्या सदस्य असलेल्या सर्व क्लासमध्ये शिक्षकांनी रिकाम्या वर्गात काळय़ा फिती लावून शिकवणी घेत अनोखे आंदोलन केले.
नववी ते बारावी क्ला सुरू करण्यास परवानगी द्या, क्लास व्यवसायाला लघु उद्योगाचा दर्जा द्या, स्टार्टअपनुसार आर्थिक बळ द्या, क्लास सुरू होत नाहीत तोपर्यंत क्लास शिक्षक, सहशिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱयांना दरमहा दहाहजार रूपये बेरोजगार भत्ता द्या, क्लास इमारत भाडे, कर्जावरील व्याज, वीज बिल, घरफाळ माफ करावा, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
यावेळी केप्टाचे अध्यक्ष प्रा. सुभाष देसाई, उपाध्यक्ष अतुल निगुंरे, सचिव संजय वराळे, संजय यादव, विवेक हिरवडेकर, रंगराव जाधव, नारायण निळपणकर, विकास काशिद, उत्तम मेथे, बाजीराव जठार, संजय देसाई, संगीता स्वामी, सुशिला घुगरे, भारती आरगे, सविता जोशी, अंजली मांगलेकर, शिल्पा ठणाळे, अंजली कुलकर्णी, दिशा पाध्ये, निलीमा कुलकर्णी, अनुराग अथणे, वैशाली लाड, साक्षी साखरदांडे उपस्थित होते.