ऑनलाईन टीम / शिमला :
केरळमध्ये गर्भवती हत्तींनीला अननसातून फटाके खायला घातल्याचा प्रकार ताजा असतानाच हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यात त्याची पुनरावृत्ती झाली आहे. बिलासपूरमध्ये एका गर्भवती गाईला खाण्यामधून स्फोटकं देण्यात आल्याचे निष्पन्न झाले असून, पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.
बिलासपूरच्या जनदुत्ता भागात राहणाऱ्या गुर्दील सिंह यांच्या मालकीची ही गाय असून, त्यांनी शेजारी राहणाऱ्या नंदलाल नामक व्यक्तीवर स्फोटकं खायला घातल्याचा आरोप केला आहे.
गुर्दील सिंह यांनी या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंद केला आहे. या व्हिडिओत गर्भवती गाईच्या जबड्याला गंभीर दुखापत झाल्याचे दिसत आहे. तसेच गाईच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.