शैलजा यांच्यासारखे काम करण्याचे आव्हान
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळचे ‘आरोग्य’ सांभाळण्याची जबाबदारी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी वीणा जॉर्ज यांना दिली आहे. कोरोना संकट हाताळण्यास आपले प्राधान्य असून राज्य प्रशासन कोविड डिफेन्स प्लॅन अंतर्गत पावले टाकणार आहे. मुख्यमंत्री विजयन आणि माजी आरोग्य मंत्री के.के. शैलजा यांनी आरोग्य विभागाची जबाबदारी सांभाळत उत्तम कामगिरी केली आहे. केरळने एक उत्तम प्रारुप तयार केले असून त्याचे अनुकरण अन्य राज्येही करत असल्याचे उद्गार वीणा यांनी काढले आहेत.
माजी पत्रकार तसेच अरनमुला येथील आमदार जॉर्ज यांनी लोकप्रिय के.के. शैलजा यांची जागा घेतली आहे. शैलजा यांना नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेले नाही. आरोग्य तसेच कुटुंब कल्याण विभागासह जॉर्ज यांना महिला तसेच बाल कल्याण विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जॉर्ज यांना पहिल्यांदाच मंत्रिपद मिळाले आहे. त्यांच्यासमोर शैलजा यांच्यासारखे काम करण्याचे आव्हान आहे.
राज्याने तयार केलेल्या योजनेचा आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वीकार करण्यात आला आहे. राज्यात सध्या लॉकडाउन असून रुग्णसंख्येत घट होत आहे. ऑक्सिजनच्या मागणीत घट झाली असून आता आम्ही लॉजिस्टिक्सवर लक्ष केंद्रीत करत आहोत. स्थानिक पातळीवर कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे. आम्ही सातत्याने आमची वैद्यकीय क्षमता वाढवत आहोत असे वीणा यांनी म्हटले आहे.
राज्यात म्युकोरमयासिसमुळे आतापर्यंत एकाचा मृत्यू झाला आहे. हा काही नवा आजार नाही, 2019 मध्ये याचे 15 रुग्ण सापडले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर या आजाराचा मृत्यूदर 40 टक्के आहे. 2019 मध्ये केरळमध्ये केवळ दोन जणांचा मृत्यू झाला होता. राज्यात यंदा आतापर्यंत ब्लॅक पंगसचे केवळ 13 रुग्ण सापडले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री विजयन यांनी गृह खात्यासह अनेक महत्त्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत. तर जावई पी.ए. मोहम्मद रियास याला सार्वजनिक बांधकाम खाते दिले आहे. पहिल्यांदाच आमदार झालेले के. एन. बालगोपाल यांना अर्थमंत्रिपद मिळाले आहे.