विवाह सोहळा पार पडला : मशीद समितीने उचलला खर्च
अलप्पुझा :
केरळमधील लोकांनी सामाजिक सौहार्दाचे उत्तम उहादरण सादर केले आहे. केरळच्या अलप्पुझा येथील एका मशिदीत हिंदू जोडप्याचा विवाह सोहळा रविवारी पार पडला आहे. या विवाह सोहळय़ात दोन्ही समुदायाच्या लोकांनी भाग घेतला आहे. या विवाह सोहळय़ाचे आयोजन चेरुवली मुस्लीम जमात मशिदीने केले होते. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी फेसबुकवर पोस्ट करत या दांपत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
युवतीच्या आईने विवाह सोहळय़ासाठी मशीद समितीकडे मदत मागितली होती. समितीच्या सदस्यांनी पुढाकार घेत मशिदीत विवाह सोहळा आयोजित केला आहे. तसेच वधूला सोन्याची 10 नाणी आणि दोन लाख रुपये भेटीदाखल दिले आहेत. 1 हजार लोकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती अशी माहिती मशीद समितीचे पदाधिकारी नुजमुद्दीन यांनी दिली आहे.
वडिलांच्या मृत्यूमुळे संकट
संबंधित कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी नुजुमुद्दीन यांनी वैयक्तिक पातळीवर मदत केली होती. विवाहाचा खर्च अधिक असल्याने मशीद समितीला आवाहन करण्यात आले होते. समितीने कुटुंबाची मदत करण्याचा निर्णय घेतला होता. 2018 मध्ये अंजूचे वडिल अशोकन यांचा मृत्यू झाल्याने कुटुंब आर्थिक संकटाला तोंड देत आहे.