थिरुवनंतपुरम / वृत्तसंस्था
केरळमधील डाव्या आघाडीचे नेते पिनराई विजयन यांनी सलग दुसऱयांदा केरळच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ एका साध्या समारंभात येथे गुरूवारी घेतली आहे. केरळचे राज्यपाल अरीफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. शपथविधी कार्यक्रमाला मोजकेच आमंत्रित उपस्थित होते. यावेळी कोरोनाच्या सर्व नियमांचे कसोशीने पालन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी विजयन यांना अभिनंदनाचा संदेश शपथविधीनंतर त्वरित पाठविला आहे.
विजयन यांच्या समवेत 20 मंत्र्यांचाही शपथविधी झाला. त्यांच्यापैकी 15 जणांना भारतीय राज्य घटनेच्या नावे तर 5 जणांनी देवाच्या नावे शपथग्रहण केले. या कार्यक्रमावर विरोधी पक्षांच्या काँगेस आघाडीने बहिष्कार टाकला होता. तथापि, ज्येष्ठ काँगेस नेते रमेश चेन्नीथला यांनी फोनवरून विजयन यांचे अभिनंदन केले.
केरळ उच्च न्यायालयाचा आदेश शपथविधी कार्यक्रमाला आमंत्रित अतिथींच्या संख्येवर कठोर बंधन असावे, असा आदेश शपथग्रहण कार्यक्रमापूर्वी केरळ उच्च न्यायालयाने दिला होता. या आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात आले, असे स्पष्ट करण्यात आले. कार्यक्रमाला मार्क्सवादी नेते सीताराम येच्युरी, पॉलिट ब्युरो सदस्य, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कानम राजेंद्रन आणि विविध धार्मिक आणि जातींच्या नेत्यांचीही उपस्थिती होती. मंत्रिमंडळात समाविष्ट असणाऱयांच्या कुटुंबियांनी हा कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पाहिला, अशी माहिती देण्यात आली.