वृत्तसंस्था/ थिरूवनंतपुरम्
पुढील महिन्यात खेळविल्या जाणाऱया सय्यद मुश्ताक अली टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेसाठी मंगळवारी केरळच्या क्रिकेट संघटनेने 26 जणांचा केरळचा संभाव्य संघ जाहीर केला. केरळच्या या संभाव्य संघामध्ये भारताचा माजी वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतचा समावेश करण्यात आला आहे.
आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंग प्रकरणात दोषी ठरल्याने 37 वर्षीय श्रीशांतवर बीसीसीआयने बंदी घातली होती. या संघात संजू सॅमसन, सचिन बेबी, जलराज सक्सेना, रॉबिन उथाप्पा आणि बेसिल थंपी यांचाही समावेश आहे. मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा 2 जानेवारीपासून सुरू होणार आहे. श्रीशांतवर घालण्यात आलेल्या बंदीचा कालावधी गेल्या सप्टेंबरमध्ये संपला आहे. आता तो पुन्हा क्रिकेट क्षेत्रात पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे. श्रीशांतने यापूर्वी म्हणजे 2011 साली आपला शेवटचा सामना भारतीय संघाकडून खेळला होता.