काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडी- गरीबांसाठी घरांच्या निर्मितीचे आश्वासन
वृत्तसंस्था / तिरुअनंतपुरम
केरळमध्ये विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफने राज्यात 6 एप्रिल रोजी होणाऱया विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी स्वतःचे घोषणापत्र ‘पीपल्स मेनिफेस्टो’ सादर केले आहे. यात सर्व पांढऱया रंगाचे रेशनकार्ड असलेल्यांना मोफत 5 किलो तांदूळ आणि गरीबांसाठी 5 लाख रुपयांच्या निधीद्वारे घर निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
युडीएफने शबरीमलाच्या भगवान अयप्पा मंदिराच्या परंपरांच्या रक्षणासाठी एक विशेष कायदा लागू करणे आणि राजस्थानच्या धर्तीवर शांतता तसेच सौहार्द विभाग निर्माण करण्याचे आश्वासन दिले आहे. शासकीय नोकरीसाठी परीक्षा देणाऱया अन् मातृत्व अनभुवत असलेल्या महिलांना वयोमर्यादेत 2 वर्षांची सूट देण्यात येणार असल्याचे युडीएफने म्हटले आहे. याचबरोबर 40-60 वयोगटातील नोकरी न करणाऱया गृहिणींना 2 हजार रुपयांचे मासिक निवृत्तिवेतन देण्याचे आश्वासन घोषणापत्रात नमूद आहे.
कोविड-19 ने प्रभावित लोकांना मोफत खाद्यपाकिटे देण्यात येतील असे घोषणापत्र समितीचे अध्यक्ष बेनी बेहानन यांनी सांगितले आहे. तर सत्तारुढ एलडीएफनेही गृहिणींना मासिक वेतन देण्याचे आश्वासन दिले आहे.