ऑनलाईन टीम / तिरुअनंतपुरम :
देशाला ओमिक्रॉन व्हेरिएंटची चिंता सतावत असतानाच आता केरळमध्ये बर्ल्ड फ्लूचे संकट ओढावले आहे. केरळच्या अलप्पुझा जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाला असून, आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे.
पुरक्कड येथून पाठवलेल्या बदकांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची पुष्टी झाल्यानंतर अलप्पुझाचे जिल्हा दंडाधिकारी ए. अलेक्झांडर यांनी गुरुवारी पशुसंवर्धन, आरोग्य आणि पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाने थाकाझी ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 10 च्या एक किलोमीटरच्या परिसरात बदके, कोंबडी आणि पाळीव पक्षी मारण्याचे आदेश दिले आहेत. पक्षी मारण्यासाठी प्रशासनाने पशुसंवर्धन विभागाचे प्रतिसाद पथकही तयार केले आहे.
दरम्यान, प्रशासनाने चंपाकुलम, नेदुमुडी, मुत्तर, वियापुरम, करुवट्टा, थ्रिकुन्नापुझा, थाकाझी, पुरक्कड, अंबालापुझा दक्षिण, अंबालापुझा उत्तर, हरिपाद नगरपालिका क्षेत्रात निर्बंध लागू केले आहेत. तसेच बाधित भागात कोंबडी, बदके आणि पक्ष्यांची अंडी, मांस इत्यादींच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.