मडगाव
केरळ ब्लास्टर्स आणि एटीके-मोहन बागान यांच्यातील लढतीने आज शुक्रवारी बांबोळीतील जीएमसी ऍथलेटीक स्टेडियमवर सातव्या आयएसएल फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होत आहे. ही लढत संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. त्याचे प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवरून होणार आहे.
निष्ठावान चाहत्यांचा पाठिंबा, चुरशींच्या लढतींचा इतिहास, स्टार फुटबॉलपटूंचा भरणा आणि अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन असे समान दुवे असलेले संघ आज या लढतीने आमनेसामने येतील. यामुळे या लढतीने आयएसएल फुटबॉल स्पर्धेला जोरदार प्रारंभ होण्याची अपेक्षा आहे.
सुमारे आठ महिन्यांच्या खंडानंतर भारतात सुरू होत असलेली ही पहिली मोठी क्रीडा स्पर्धा असेल. सलामीच्या लढतीत हे दोन संघ आमनेसामने येण्याची ही सलग तिसरी वेळ आहे. पहिल्या दोन लढतींमधील विजयामुळे दोन वेळचा उपविजेता केरळ ब्लास्टर्स तिसऱया वेळीही बाजी मारणार का, याची उत्सुकता आहे.
या दोन संघांतील मागील लढतीपासून बरेच काही बदलले आहे. केरळ ब्लास्टर्सचे मुख्य प्रशिक्षक एल्को शात्तोरी यांच्याकडून किबू व्हिकुना यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे आली आहेत. त्यामुळे ब्लास्टर्सच्या कामगिरीचा अंदाज बांधणे अवघड असेल. गेल्या मोसमात व्हिकूना यांच्या मार्गदर्शनाखाली मोहन बागान संघाने आय-लीग फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले आहे. या संघाने आक्रमक शैलीचा खेळ प्रदर्शित केला. आता त्यांना आपल्या पूर्वीच्या क्लबविरूद्ध आपली क्षमता सिद्ध करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. मोहन बागानविषयी माझ्या भावना नेहमीच चांगल्या असतील. मी एक फुटबॉल मोसम त्यांच्याकडे होतो व त्यांनी मला चांगली वागणूक दिली. बागानच्या व्यवस्थापकीय मंडळात माझे बरेच मित्रही आहेत, असे स्पेनचे प्रशिक्षक असलेले व्हिकुना म्हणाले. आता मी ब्लास्टर्समध्ये येऊनही आनंदात आहे. मी सर्वोत्तम कामगिरी माझ्या खेळाडूंकडून करून घेणार आहे. उत्तम खेळ करण्यासाठी प्रयत्नशील असलेला चांगला संघ घडविण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे ते
म्हणाले. दुसरीकडे गतविजेता आणि एकूण तीन वेळचा विजेता एटीके यंदाही संभाव्य विजेता असेल. अँटोनियो लोपेझ हबास यांच्या मार्गदर्शनाखालील संघ आणखी भक्कम करण्यात आला आहे. व्हिकुना यांनी आय-लीग फुटबॉल स्पर्धेत बागानसाठी चांगली कामगिरी बजावली, पण आयएसएल ही वेगळी स्पर्धा आहे. मला त्यांच्याविषयी आदर वाटतो, पण तीन गुण मिळविण्याचा आमचा निर्धार आहे, असे यावेळी एटीकेचे प्रशिक्षक हबास म्हणाले.