वृत्तसंस्था/ विम्बल्डन स्वित्झर्लंडच्या
फुक्सोविक्स, मुचोव्हा, फेडररही शेवटच्या आठमध्ये, व्हेरेव्ह, रुबलेव्ह, गॉफ स्पर्धेबाहेर, एम्माची माघार
सहाव्या मानांकित रॉजर फेडररने विम्बल्डन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विक्रमी 18 व्या वेळी उपांत्यपूर्व फेरी गाठली. याशिवाय ऑस्ट्रेलियाची ऍला टोमलानोविक, माजी विजेती जर्मनीची अँजेलिक केर्बर, झेकची कॅरोलिना मुचोव्हा, कॅनडाचा फेलिक्स ऑगर ऍलियासिमे, हंगेरीचा मार्टन फुक्सोविक्स यांनीही या स्पर्धेच्या शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले आहे. इटलीचा लॉरेन्झो सोनेगो, जर्मनीचा चौथा मानांकित अलेक्झांडर व्हेरेव्ह, रशियाचा पाचवा मानांकित आंदे रुबलेव्ह, अमेरिकेची युवा खेळाडू कोको गॉफ, स्पेनची 30 वी मानांकित पॉला बडोसा यांचे आव्हान समाप्त झाले तर ब्रिटनच्या एम्मा रॅडुकानूने दुखापतीमुळे माघार घेतली.
23 व्या मानांकित सोनेगोने पहिल्या सेटमध्ये फेडररविरुद्ध चांगला संघर्ष केला. पण 5-5 वर असताना पावसाचे आगमन झाल्याने सुमारे 20 मिनिटे खेळ थांबवावा लागला. या ब्रेकमुळे त्याची लय बिघडल्याने आठवेळचा चॅम्पियन 40 वर्षीय फेडररने त्याचा लाभ घेत हा सामना 7-5, 6-4, 6-2 असा जिंकून 18 व्या वेळी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. ही फेरी गाठणारा तो सर्वात वयस्कर खेळाडू बनला आहे. त्याची पुढील लढत मेदवेदेव्ह किंवा पोलंडचा हय़ुबर्ट हुरकाझ यापैकी एकाशी होईल.
व्हेरेव्हला फेलिक्सकडून धक्का
सोळाव्या मानांकित कॅनडाच्या फेलिक्स ऑगर ऍलियासिमेने धक्कादायक निकाल देताना चौथ्या मानांकित जर्मनीच्या व्हेरेव्हला पाच सेट्सच्या झुंजार लढतीत 6-4, 7-6 (8-6), 3-6, 3-6, 6-4 असा धक्का दिला. त्याची पुढील लढत इटलीचा सातवा मानांकित मॅटेव बेरेटिनीशी होणार आहे. व्हेरेव्हला 20 डबल फॉल्ट्स आणि 42 चुकांचा फटका बसला तर फेलिक्सने 17 बिनतोड सर्व्हिस केल्या.
जागतिक क्रमवारीत 48 व्या स्थानावर असणाऱया मार्टन फुक्सोविक्स हा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणारा हंगेरीचा तिसरा आणि गेल्या 73 वर्षातील पहिला खेळाडू आहे. त्याने येथे रशियाच्या पाचव्या मानांकित आंद्रे रुबलेव्हचे आव्हान 6-3, 4-6, 4-6, 6-0, 6-3 असे संपुष्टात आणले. त्याची पुढील लढत जोकोविचशी होणार आहे. बेला व्हॉन केहरलिंग (1929), जोसेफ ऍस्बॉथ (1948) या हंगेरियन खेळाडूंनी याआधी या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती.
एम्माची माघार
महिला एकेरीत ब्रिटिश युवा खेळाडू एम्मा रॅडुकानूची स्वप्नवत घोडदौड निराशाजनक स्थितीत थांबली. चौथ्या फेरीच्या या सामन्यावेळी एम्माला श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला सामना सोडून देणे भाग पडले. 18 वर्षीय एम्माने अनुभवी टोमलानोविकला पहिल्या सेटमध्ये बऱयापैकी झुंजवले. मात्र हा सेट तिला 4-6 असा गमवावा लागला. यानंतर तिला शारीरिक त्रास होत असल्याचे दिसत होते आणि ती 0-3 अशी पिछाडीवर पडली असताना ती बाजूला जाऊन बसली. डॉक्टरांनी तिची तपासणी केली, पण ती उपचार घेण्यासाठी कोर्टबाहेर गेली. बराच वेळ झाल्यानंतर ती सामना पुढे चालू ठेवण्यास असमर्थ असल्याचे पंचांनी जाहीर केल्यावर स्थानिक प्रेक्षकांनी निराशा व्यक्त केली. तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिने हा निर्णय घेतल्याचे नंतर आयोजकांनी स्पष्ट केले. जागतिक क्रमवारीत 75 व्या स्थानावर असणाऱया टोमलानोविकची पुढील लढत ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीविरुद्ध होणार आहे.
गॉफ पराभूत
2018 मध्ये ही स्पर्धा जिंकलेल्या जर्मनीच्या केर्बरने शानदार खेळाचे प्रदर्शन करीत अमेरिकेच्या 17 वर्षीय कोको गॉफचे आव्हान 6-4, 6-4 असे संपुष्टात आणले. सुमारे सव्वातास ही लढत रंगली होती. ही स्पर्धा जिंकणारी केर्बर ही एकमेव खेळाडू राहिली असून तिची पुढील लढत झेकच्या कॅरोलिना मुचोव्हाशी होणार आहे. दोन वर्षांपूर्वीही या स्पर्धेत गॉफला याच टप्प्यावर पराभव स्वीकारावा लागला होता. मुचोव्हाने दुसऱयांदा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठताना स्पेनच्या पॉला बडोसाचे आव्हान 7-6 (8-6), 6-4 असे परतावून लावले. 19 वे मानांकन असलेल्या मुचोव्हाने या वर्षी झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत जागतिक अग्रमानांकित बार्टीला धक्का देत उपांत्य फेरी गाठली होती तर 2019 मध्ये तिने शेवटच्या आठ फेरीपर्यंत मजल मारली होती.