रोम
इटालियन ओपन टेनिस स्पर्धेच्या महिला विभागात स्पेनची गार्बिन मुगुरुझा, रशियाची स्वेतलाना कुझनेत्सोव्हा यांनी दुसरी फेरी गाठली तर स्लोअन स्टीफेन्स व जर्मनीची अँजेलिक केर्बर यांचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.
माजी अग्रमानांकित केर्बरला क्ले कोर्टवर जम बसवणे कठीण गेले. यूएस ओपनची तिने चौथी फेरी गाठली होती. पण येथे तिला पहिल्याच फेरीत झेकच्या कॅटरिना सिनियाकोव्हाने 6-3, 6-1 असे नमविले. येथे तिला 15 वे मानांकन मिळाले होते. नववे मानांकन मिळालेल्या मुगुरुझाने अमेरिकेच्या स्टीफेन्सवर 6-3, 6-3 अशी मात केली.
तिची लढत अमेरिकेच्या 16 वर्षीय कोको गॉफशी होईल. गॉफने टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉचा 6-4, 6-3 असा पराभव केला. क्ले कोर्टवरील गॉफचा हा कारकिर्दीतील पहिलाच विजय आहे. कुझनेत्सोव्हाला मात्र विजयासाठी झगडावे लागले. तिने अमेरिकेच्या बर्नार्डा पेरावर 3-6, 7-6 (7-3), 6-3 असा विजय मिळवित आगेकूच केली. इस्टोनियाच्या ऍनेट कोन्टोवेटशी तिची पुढील लढत होईल. अन्य एका सामन्यात झेकच्या मर्केटा व्होन्ड्रूसोव्हाने जपानच्या मिसाकी दोईचा 6-1, 4-6, 6-4 असा पराभव केला.