उत्तरप्रदेशातील सिवान शहरात सध्या केळय़ाचा एक घड ज्याच्या त्याच्या चर्चेचा विषय बनला आहे. सर्वसाधारणपणे केळय़ाच्या घडाची उंची अडीच ते तीन फूट असते. या घडाची उंची चक्क साडेदहा फूट आहे. त्याची किंमतही या उंचीला साजेशी म्हणजे 15 हजार रुपये आहे. या घडाचे मालक दिग्विजय तिवारी हे आहेत. अद्याप हा घड विकला गेलेला नाही. मात्र, त्याला बघण्यासाठी गर्दी होते.
या केळय़ांची निर्मिती भारतीय आणि सिंगापुरी केळय़ांच्या वाणांचे क्रॉसब्रिड करून झालेली आहे. तिवारी यांनी दोन वर्षापूर्वी हे वाण आणले होते. त्याची यशस्वीरीत्या लागवड करून 15 फूट उंचीचे केळय़ाचे झाड लावण्यात आले. या केळय़ाच्या रोपटय़ाची किंमतच अकराशे रुपये आहे. हे क्रॉसब्रिड करणे जटिल असून अनेक प्रयोग फसल्यानंतर ते तंत्रज्ञान विकसित झालेले आहे.
तिवारी यांनी आपल्या जागेत या केळय़ाचे पुनर्रोपण (रिप्लांटेशन) केले. अशी चार-पाच रोपटी त्यांनी लावली. त्यापैकी केवळ एका झाडाला 10 फूट उंचीचा घड लागला. तो पाहून स्थानिक लोकांच्या मनात शंका उत्पन्न झाली. हे केळे जंगली किंवा विषारी तर नाही ना? या शंकेपोटी प्रारंभी तो विकत घेण्यास कोणी तयार झाले नाही. मात्र, आता त्याला ग्राहक मिळत आहे. सोशल मीडियावर हा घड व्हायरल झाल्यानंतर त्याची किंमत वाढली असून 15 हजार रुपयांपर्यंत देण्यास लोक तयार आहेत. येत्या पाच-सहा दिवसात तो विकला जाणार आहे.