निवडणूक अधिकाऱयांच्या बैठकीत झाले स्पष्ट
बेळगाव / प्रतिनिधी
मनपा निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार आणि सूचकांचे ‘नो डय़ूज’ सर्टिफिकेट जोडणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र केवळ उमेदवाराचे ‘नो डय़ूज’ प्रमाणपत्र सक्तीचे असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी झालेल्या निवडणूक अधिकाऱयांच्या बैठकीत करण्यात आले. तसेच अन्य वॉर्डातील उमेदवार असल्यासच सर्टिफाईड मतदारयादी जोडणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ‘नो डय़ूज’ प्रमाणपत्र आणि सर्टिफाईड मतदारयादी बंधनकारक असल्याचे सांगण्यात आल्याने संभ्रम निर्माण झाला होता. प्रत्येक उमेदवाराला सहा सूचक देणे आवश्यक आहे. उमेदवार आणि सहा सूचकांचे ‘नो डय़ूज’ प्रमाणपत्र आणि त्यांची सर्टिफाईड मतदारयादी मिळविण्यासाठी मनपा कार्यालयात गर्दी झाली होती. सूचकांचे ‘नो डय़ूज’ सर्टिफिकेट आवश्यक नसल्याचे काही निवडणूक अधिकाऱयांनी सांगितले होते. तर काहींनी ‘नो डय़ूज’ सर्टिफिकेट जोडण्याची सूचना केली होती. त्यामुळे संभ्रम निर्माण होऊन नेमके कुणासाठी ‘नो डय़ूज’ सर्टिफिकेट गरजेचे आहे, असा मुद्दा उपस्थित झाला होता. शुक्रवारी सायंकाळी निवडणूक अधिकाऱयांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे याची माहिती प्रशिक्षकांनी दिली. त्यावेळी ‘नो डय़ूज’ प्रमाणपत्राचा संभ्रम दूर करण्यात आला आहे. केवळ उमेदवाराचे ‘नो डय़ूज’ प्रमाणपत्र सक्तीचे असल्याचे सांगण्यात आले.