जनतेने पुढे येण्याचे जिल्हाधिकाऱयांचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारच्या मार्गसूचीनुसार जिल्हय़ामध्ये कोविशिल्डचा दुसरा डोस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तरी दुसरा डोस घेण्यास जनतेने पुढे यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी केले आहे.
व्हॅक्सिनच्या उपलब्धतेनुसार सरकारी तालुका आरोग्य केंद्र तसेच इतर सरकारी हॉस्पिटलमध्ये या कोविशिल्डचा डोस दिला जात आहे. तेव्हा सरकारच्या मार्गसूचीनुसारच ज्यांना जो वेळ दिला आहे, त्यांनीच कोविशिल्ड घेण्यास पुढे यावे, असे त्यांनी कळविले आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 24 दिवसांनी हा डोस दिला जात आहे. तेव्हा जे पात्र व्यक्ती आहेत, त्यांनाच हा डोस दिला जाणार आहे.
आरोग्यसेवा कर्मचारी तसेच कोरोना योद्धय़ांना आणि 45 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांनाच ही कोविशिल्ड लस दिली जात आहे. तरी जवळच्या आरोग्य केंद्रावर जाऊन हा डोस घ्यावा, असे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी सांगितले आहे.