तहानेने तडफडत असला तरीही पित नाही अन्य पाणी
पृथ्वीवर एकूण कोटय़वधी पक्षी राहतात, ज्यातील अनेक प्रजाती अत्यंत दुर्लभ आहेत. या पक्ष्यांपैकी काही असे आहेत, जे स्वतःच्या वैशिष्टय़ामुळे पूर्ण जगात ओळखले जातात. जिवंत राहण्यासाठी पृथ्वीवर प्रत्येक जीवासाठी पाणी अत्यंत गरजेचे असते. काही प्राणी कमी प्रमाणात पाणी पिऊन जिवंत राहू शकतात, परंतु सर्वांना पाण्याची गरज असते.
एक पक्षी तहानेने तडफडत असला तरीही नदी किंवा तलावाचे पाणी पित नाही. हा पक्षी केवळ पावसात पडणारे पाणीच पित असतो. पाऊस पडू लागल्यावर हा पक्षी स्वतःची तहान भागवितो. या विशेष पक्षाचे नाव चातक असून त्याला अनेकदा तहान लागलेली असते, तरीही तो अन्य कुठलेच पाणी पित नाही. केवळ पावसाचेच पाणी पित असतो.
चातक तहानेने तडफडत असला आणि पाण्याने भरलेल्या सरोवरात त्याला सोडले तरीही तो पाणी पिण्यासाठी स्वतःची चोच उघडत नसल्याचे बोलले जाते. हा पक्षी याप्रकरणी अत्यंत स्वाभिमानी असतो. केवळ आशिया आणि आफ्रिका खंडातच चातक पक्षी आढळून येतो. हा भारतातील उत्तराखंडमध्ये प्रामुख्याने आढळून येतो.
हा पक्षी आकाशाच्या दिशेनेच बहुतांश वेळ नजर लावून असतो. उत्तराखंडच्या गढवालमध्ये लोक या पक्षाला चोली या नावाने ओळखतात. तर मारवाडीमध्ये मघवा आणि पपिया असे या पक्ष्याला म्हटले जाते.