दोन तासांचा दौरा, पण नुकसानीची पाहणी नाही
वार्ताहर / देवगड:
तौक्ते चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ाच्या दौऱयावर आलेले केंद्रीय पथक रविवारी दुपारी देवगड तालुक्यात दाखल झाले. मात्र, देवगड तालुक्यात नुकसानीची कोणत्याही प्रकारची पाहणी न करता हे पथक कुणकेश्वर येथील एमटीडीसी केंद्रामध्ये पाहुणचार घेत सायंकाळी सव्वाचार वाजता मालवणकडे रवाना झाले. या केंद्रीय पथकासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त कुणकेश्वर येथे तैनात करण्यात आला होता.
तौक्ते चक्रीवादळात देवगड तालुक्यातील किनारी भागात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी दुपारी दाखल झाले. नवी दिल्ली येथील केंद्रीय मंत्रालयाच्या कौन्सिल विभागाचे सचिव अशोककुमार परमार यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे संचालक अभयकुमार, केंद्रीय उर्जा विभागाचे अधीक्षक इंजिनिअर जे. के. राठोड, केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग, मुख्य अभियंता देवेंद्र चाफेकर, मत्स्य व्यवसाय विभागाचे अशोक कदम सहभागी झाले होते.
रत्नागिरीहून आंबेरीमार्गे देवगड तालुक्यात दाखल झालेल्या पथकाच्या वाहनांचा ताफा थेट कुणकेश्वर येथील एमटीडीसी केंद्रात दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. तेथे पथकाचे स्वागत जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. यावेळी कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, देवगड प्रांताधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार मारुती कांबळे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब आदी उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील नुकसानीचा कोणत्याही प्रकारचा आढावा न घेता या पथकाने तेथे केवळ पाहुणचार घेतला व सव्वाचार वाजण्याच्या सुमारास हे पथक मालवणकडे रवाना झाले. देवगड तालुक्यातील नुकसानीची माहिती केंद्रीय पथकाला देण्यासाठी सर्व विभागाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग सकाळपासूनच कुणकेश्वर येथे उपस्थित होते.
पथकाच्या संपर्कात येणाऱयांची रॅपिड टेस्ट
केंद्रीय पथक जिल्हय़ात येणार म्हणून सिंधुदुर्ग पोलिसांच्यावतीने मोठी सुरक्षा ठेवण्यात आली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली सुमारे 40 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक अधिकारीही सहभागी होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पथकाच्या संपर्कात येणाऱया अधिकारी व कर्मचारी वर्गाची प्रथम कोरोना रॅपिड टेस्ट करण्यात आली होती.