3 वेळा घेतला घटस्फोट
ऑफिसमधून सुटी घेण्यासाठी काही लोक विचित्र कारणे पुढे करत असताना अनेकदा लोक स्वतःच्या नातलगालाच मारून टाकतात. पण कुणी स्वतःच्या सुटीसाठी अनेकदा विवाह केल्याचे ऐकले आहे का? एका व्यक्तीने स्वतःची पेड लीव्ह वाढविण्यासाठी एकाच मुलीसोबत चारवेळा विवाह केला आणि तीनवेळा तिला घटस्फोट दिला आहे.
हे अजब प्रकरण तैवानमधील आहे. येथील एका व्यक्तीने 37 दिवसांमध्ये एकाच मुलीशी 4 वेळा विवाह केला आणि तीनवेळा तिला घटस्फोटही दिला आहे. या व्यक्तीने केवळ स्वतःची पेड लीव्ह (सुटी) वाढविण्यासाठी हा प्रकार केला आहे.
बँकेत करतो काम
हा व्यक्ती तैपैईतील एका बँकेत क्लार्क म्हणून काम करतो. त्याने विवाहासाठी रजा मागितल्यावर केवळ 8 दिवसांचीच रजा मान्य झाली. 6 एप्रिल 2020 रोजी त्याचा विवाह झाला आणि काही दिवसांनी सुटी संपली.
चारवेळा विवाह
त्यानंतर संबंधित व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला घटस्फोट दिला आणि पुन्हा तिच्याशीच विवाह केला. कायदा तसेच नियमांचा दाखला देत त्याने सुटीसाठी पुन्हा अर्ज केला. त्याने हा प्रकार सलग चारवेळा केला आणि तीनवेळा घटस्फोट दिला. अशाप्रकारे त्याने 4 विवाहांसाठी एकूण 32 दिवसांची सुटी घेतली आहे.
बँकेला अखेर कळले
पण त्याच्या योजनेनुसार सर्वकाही घडत गेले नाही. संबंधित कर्मचारी काय करू पाहतोय हे बँकेला समजल्याने अतिरिक्त पेड लीव्ह देण्यास नकार दिला. अतिरिक्त पेड लीव्हसाठी नकार मिळाल्यावरही कर्मचाऱयाने चारवेळा विवाह आणि तीनवेळा घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला.
बँकेविरोधात तक्रार
बँकेने सुटीस नकार दिल्यावर कर्मचाऱयाने तैपैई सिटी लेबर ब्युरोत तक्रार नोंदविली आहे. त्याने बँकेवर कामगार कायद्यातील कलम 2 चे पालन न करणे आणि कायदा भंगाचा आरोप केला आहे. कायद्यानुसार कर्मचाऱयांचा विवाह असल्यास 8 दिवसांची पेड लीव्ह देणे अनिवार्य आहे.