येळळूरमध्ये भरधाव ट्रकने दिली तीन दुचाकींना धडक, ट्रक चालकाला दिला चोप
बेळगाव / प्रतिनिधी
येळळूर गावातून नेहमीच भरधाव वेगाने ट्रक धावत असतात. याबाबत अनेक वेळा तक्रारी करण्यात आल्या. मात्र त्याकडे पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सोमवारीही अशाच भरधाव वेगाने येणाऱया ट्रकने तीन दुचाकींना धडक दिली. दहावीच्या परीक्षा केंद्र असलेल्या शिवाजी विद्यालयाजवळच सकाळी 9.30 च्या सुमारस घटना घडली. सुदैवानेच मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेत दुचाकीस्वार जखमी झाला तर इतर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
देसूरकडून बेळगावकडे येणारा ट्रक क्रंमाक एम. एच. 12 सी. एच 144 शिवाजी विद्यालयाजवळ आला. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱया तीन दुचाकींना धडक दिली. यामध्ये विनायक परशराम गुरव (वय 30 रा. देसूर) हा जखमी झाला. दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्राजवळ उपस्थित होते. ट्रकचा वेग पाहून तेथील विद्यार्थ्यांनी मागे सरकत आपला बचाव केला. मात्र समोरून जाणाऱया तीन दुचाकींना धडक दिली.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी ट्रक चालकाला चांगलाच चोप दिला. त्यानंतर उपस्थित असलेल्या पोलीसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेऊन पोलीस स्थानकात त्याला पाठविले. सतत गजबजलेल्या ठिकाणी हा अपघात घडला. मात्र सुदैव म्हणून मोठा अनर्थ टळला.
अवजड वाहनांचा बंदोबस्त करा
येळळूर रस्त्यावरून मोठया प्रमाणात वाळू, विटा, माती याची वाहतुक करणाऱया ट्रकांचा वेग अधिक असतो. यरमाळ भागातून तर 30 ते 40 टन वाहतूक करणारे ट्रक नेहमी धावत असतात. या सर्वच ट्रकवर निर्बंध घालवेत, अशी मागणी अनेक वेळा करण्यात आली. ग्राम पंचायतीने काही प्रमाणात निर्बंध घालण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला अद्याप यश आले नाही. आता तातडीने अवजड वाहनांवर बंदी घालावी, अन्यथा आम्ही तरूण मंडळीच त्याचा बंदोबस्त करू, असा इशारा देण्यात आला आहे.