गांधीनगर / वृत्तसंस्था
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. निधनसमयी त्यांचे वय 92 वर्षे इतके होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना सकाळच्या सुमारास रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी शोक व्यक्त केला आहे.
केशुभाई पटेल यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली होती. त्यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार कोरोनावर मात केल्यानंतरही त्यांची प्रकृती खालावली होती. गुरुवारी सकाळी श्वास घेण्यास त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराला प्रतिसाद देण्यापूर्वीच त्यांनी प्राण सोडला.
केशुभाई पटेल यांचा जन्म 24 जुलै 1928 मध्ये जुनागढ येथे झाला होता. त्यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात प्रवेश केला होता. त्यानंतर जनसंघ आणि भाजपसाठी त्यांनी भरीव काम केले. त्यांना दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांनी 1995 आणि 1998 मध्ये दोनवेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. परंतु 2001 मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती.