सध्या केस रंगवून घेण्याचा ट्रेंड आहे. बाजारात वेगवेगळ्या शेड्सचे हेअरकलर्स मिळतात. आपल्याला एखादी शेड आवडते आणि त्या रंगात केस रंगवून घेतले जातात. मात्र नंतर ती शेड चांगली दिसत नसल्याचं आपल्या लक्षात येतं. हा कृत्रिम रंग काढताना नाकी नऊ येतात. काही घरगुती उपायांनी तुम्ही हा रंग काढू शकता. त्याविषयी…
- बेकिंग सोडा आणि अँटी डँड्रफ शँपूच्या मिश्रणाने केसांचा नकोसा रंग काढता येईल. केसांची देखभाल करणार्या अनेक उत्पादनांमध्ये बेकिंग सोडा घातलेला असतो. अँटी ड्रँड्रफ शॅंपू आणि बेकिंग सोडय़ाच्या मिश्रणाने चांगले लाभ मिळू शकतात. अँटी डँड्रफ शँपूमधल्या ‘सेलेनियम सल्फाइड’ या घटकामुळे रंग फिका पडू लागतो. हेअर कलर काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा आणि अँटी डँड्रफ शँपूचं एकास एक असं प्रमाण घ्या. हे मिश्रण केसांना लावून पाच मिनिटं ठेऊन द्या. मग कोमट पाण्याने धुवून टाका. साधारण महिनाभर आठवडय़ातून दोन वेळा हा उपाय करा. तुमच्या केसांचा रंग हळूहळू फिका पडू लागेल.
- व्हाईट किंवा ऍपल सिडर व्हिनेगारचा वापर करूनही तुम्ही रंग घालवू शकता. एक कप पाण्यात चार चमचे व्हिनेगार घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण केसांना लावून 15 ते 20 मिनिटं ठेवा. मग सौम्य शँपूने धुवून टाका. साधारण महिनाभर आठवडय़ातून दोन वेळा हा उपाय करा.
- रंग घालवण्यासाठी ऑलिव्ह ऑईलचा वापर करू शकता. एका वाटीत थेडं ऑलिव्ह ऑईल घेऊन थोडं गरम करून घ्या. या तेलाने केसांना मसाज करा. साधारण अर्ध्या तासाने केस धुवून टाका. साधारण आठवडय़ातून तीन वेळा केसांना ऑलिव्ह ऑईल लावा.
- काकडीचा रस आणि दही यांच्या मिश्रणाचा वापर करता येईल. काकडीचा रस काढून त्यात थोडं दही घाला. हे मिश्रण केसांना लावा. अर्ध्या तासाने सौम्य शँपूने केस धुवा.
या उपायांमुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. त्यामुळे केसांचा रंग खूपच विचित्र वाटत असेल तर हे प्रयोग करून बघायला हरकत नाही.