प्रसाद नाकाडी मालिकावीर, जोतिबा गिलबिले सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
मध्यमगती गोलंदाज अनंत माळवीने शेवटचे षटक व सुपर ओव्हरमध्ये केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर के. आर. शेट्टी संघाने बीसीसी मच्छे संघावर मात करून पहिला फिनिक्स मास्टर लीग टी-20 चषक पटकाविला. प्रसाद नाकाडीने मालिकावीर तर जोतिबा गिलबिलेने सामनावीर पुरस्कार मिळवला.युनियन जिमखाना आयोजित फिनिक्स मास्टर लिग टी -20 क्रिकेट स्पर्धेचा रोमांचक ठरलेला अंतिम सामना टाय झाला. सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाली झालेला हा बेळगावातील पहिला अंतिम सामना होता. के. आर. शेट्टी किंग्स संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व बाद 122 धावा केल्या.
कर्णधार प्रशांत लायंदरने 1 षटकार आणि 3 चौकारासह 37, विजय कुरेने 21, गिरीष नाडकर्णीने 15 तर अलिम माडिवालेने 2 षटकासह 12 धावा केल्या. बीसीसी मच्छेतर्फे संदीप चव्हाणने 17 धावात 3, जोतिबा गिलबिलेने 24 धावात 3 तर प्रसाद नाकाडी, मनोज पाटील, विनित आडुरकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बीसीसी मच्छे संघाने 20 षटकात 5 बाद 122 धावाच केल्या. प्रसाद नाकाडीने 1 षटकार, 4 चौकारासह 43, आनंद करडीने 1 षटकार, 3 चौकारासह नाबाद 41, अमित पाटीलने 1 षटकार, 1 चौकारासह 18 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे भरत गाडेकरने 19 धावात 2, नंदकुमार मलतवाडकर, अलिम माडिवाले व नासिर पठाण यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शेवटच्या षटकात बीसीसी मच्छे संघाला 6 चेंडूत 5 धावांची गरज होती. सामन्यावर मच्छे संघाची मजबूत पकड असताना अनंत माळवीने या षटकात केवळ चार धावा दिल्याने सामना टाय झाला. त्यामुळे पंचांनी सुपर ओव्हरचा वापर केला. बीसीसी मच्छेने प्रथम फलंदाजी करत एका षटकात केवळ 2 धावा केल्या. त्यात प्रसाद नाकाडीने 4 चेंडूत 1 तर आनंद करडीने 2 चेंडूत 1 धाव केली. हे निर्णायक षटक अनंत माळवीने केले. त्याला उत्तर देताना के. आर, शेट्टी संघाने 5 चेंडूत 3 धावा करून सामना जिंकला. अलीम माडिवालेने 5 चेंडूत 3 धावा करून विजय मिळवून दिला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे फिनिक्स इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हीएशनच्या अलिशा नायर, कोमल जॉनी, सचिन पाच्छापुरे, भाग्यश्री देसाई, ओंकार बेनके, शाहीन मुजावर, स्टेफनी जॉन, झेवियर गोम्स यांच्या हस्ते विजेत्या के. आर. शेट्टी संघाला व उपविजेत्या बीसीसी मच्छे संघाला आकर्षक चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यातील सामनावीर जोतिबा गिलबिले, इम्पॅक्ट खेळाडू अनंत माळवी, उत्कृष्ट झेल विजय कुरी, सर्वाधिक षटकार अलिम माडिवाले, स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज संदीप चव्हाण (बीसीसी मच्छे), उत्कृष्ट फलंदाज प्रशांत लायंदर (के. आर. शेट्टी), स्पर्धेत विशेष कामगिरी करणारा खेळाडू म्हणून अमित पाटील, स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू नरेंद मांगुरे तर मालिकावीर म्हणून प्रसाद नाकाडी यांना आकर्षक चषक, रोख रक्कम व भेटवस्तू देवून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून ईश्वर इटगी, प्रमोद पवार, शेहजाद पठाण यांनी तर स्कोअरर म्हणून नंदन शिंदे, गणेश मुतगेकर, शिवानंद पाटील यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे, आरिफ बाळेकुंद्री, अनिल कुडतुडकर यांनी केले. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परशराम पाटील, मिलिंद चव्हाण व सचिन साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिमखान्याच्या खेळपट्टीची अनिल गवी व ज्योती पाटील यांनी उत्कृष्ट देखभाल ठेवल्यामुळे त्यांचाही खास सत्कार करण्यात आला.