आणखी 3 महिने ऍटर्नी जनरल पद भूषविणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
वरिष्ठ अधिवक्ते के.के. वेणुगोपाल हे आणखी तीन महिने ऍटर्नी जनरल पद भूषविणार आहेत. त्यांचा कार्यकाळ 30 जून रोजी संपुष्टात येणार होता. ऍटर्नी जनरलचा कार्यकाळ सर्वसाधारणपणे तीन वर्षांचा असतो. 2020 मध्ये ऍटर्नी जनरल म्हणून वेणुगोपाल यांचा पहिला कार्यकाळ संपुष्टात येणार होता. तेव्हा त्यांनी सरकारकडे स्वतःचे वय पाहता एक वर्षाचा कार्यकाळ देण्याची विनंती केली होती. वेणुगोपाल हे सध्या 91 वर्षांचे आहेत.
मागील वर्षीही वेणुगोपाल यांचा कार्यकाळ एक वर्षासाठी वाढविण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात अनेक चर्चेत राहिलेल्या प्रकरणांना हाताळत आहेत. त्यांचा अनुभव पाहता सरकारने त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. वेणुगोपाल हे आणखी 3 महिन्यांसाठी या घटनात्मक पदावर नियुक्त झाले आहेत.
1 जुलै 2017 रोजी मुकुल रोहतगी यांच्या जागी केंद्र सरकारचे सर्वोच्च कायदा अधिकारी, ऍटर्नी जनरल म्हणून पदभार स्वीकारला होता. वेणुगोपाल अनेक प्रमुख प्रकरणांमध्ये केंद्र सरकारचे न्यायालयात प्रतिनिधित्व करताहेत. 1931 मध्ये जन्मलेल्या वेणुगोपाल यांना कायदा क्षेत्रात 67 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. 2002 साली वेणुगोपाल यांना पद्मभूषणने गौरविण्यात आले होते. तर 2015 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला होता.