वार्ताहर/ बिबी
श्रीमंत छत्रपती संभाजीराजे चषक 2021 या राज्यस्तरीय तालुकास्तरीय टेनिस बॉल स्पर्धेत येथील के. बी. एक्स्पोर्टचा संघ अव्वल ठरला आहे. या क्रिकेट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आमदार दिपकराव चव्हाण साहेब यांच्या हस्ते झाला.
सत्यजीतराजे गणेशोत्सव मंडळ, चिंतामणी गणेशोत्सव मंडळ, विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळ, विद्यानगर गणेशोत्सव मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व श्रीमंत रामराजे युवा मंच यांच्या माध्यमातून श्रीमंत छत्रपती संभाजीराजे चषक 2021 या राज्यस्तरीय व तालुकास्तरीय टेनिस बॉल स्पर्धांचे आयोजन येथील घडसोली मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ नुकताच झाला.
यावेळी फलटणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, फलटण पंचायत समितीचे माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, नगरसेवक सनी अहिवळे, नगरसेविका सौ.दिपाली निंबाळकर, नगरसेविका सौ. सुवर्णा खानविलकर, नगरसेविका सौ.ज्योत्स्ना शिरतोडे, नगरसेविका सौ.प्रगती कापसे, नगरसेविका सौ.वैशाली चोरमले, युवा नेते तुषार नाईक निंबाळकर, अमोल भोईटे, संजय देशमुख, भाऊ कापसे, सनी शिंदे, अनिल शिरतोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
या क्रिकेट स्पर्धांच्या उपांत्य फेरीत के.बी.एक्स्पोर्ट, आर.एस.पी.वॉरियर्स (फलटण), भोर 11 व जयसिंगपूर 11 हे संघ पोहोचले होते. अंतिम फेरीत के.बी.एक्स्पोर्ट विरुद्ध जयसिंगपूर 11 या संघांमध्ये अतिशय रोमहर्षक लढत झाली. पण, के.बी.एक्स्पोर्ट संघाने विजय मिळवत श्रीमंत छत्रपती संभाजीराजे चषक 2021 या चषकावर आपले नाव कोरले आहे.
श्रीमंत छत्रपती संभाजीराजे चषक 2021 साठी प्रथम पारितोषिकाचे स्वरुप 71 हजार व चषक, द्वितीय पारितोषिकाचे स्वरुप 41 हजार रुपये व चषक, तृतीय पारितोषिकाचे स्वरुप 21 हजार रुपये व चषक तर चतुर्थ पारितोषिकाचे स्वरुप 11 हजार रुपये चषक असे होते. त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकाच्या स्वरुपात एल.ई.डी.टी.व्ही. व स्पोर्ट्स सायकल देण्यात आली. एल.ई.डी.टी.व्ही.चा मानकरी जयसिंगपूर 11 संघाचा संदीप मखवाना हा खेळाडू ठरला आहे. तर स्पोर्ट्स सायकलचा मानकरी बारामती येथील खेळाडू अक्षय तावरे हा ठरला आहे.