अर्थराज्यमंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा : दिग्गज बँकर अशी ओळख, दासगुप्तांनाही संधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीआयसीआय बँक तसेच इन्फोसिसचे अध्यक्ष राहिलेले के.व्ही. कामत यांना अर्थमंत्रालयात राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना याहून मोठी जबाबदारी मिळणार असल्याची चर्चा आहे. सातत्याने खालावणाऱया विकासदराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार उद्योगजगतातील अनुभवी व्यक्तींची मदत घेऊ इच्छिते. उद्योग जगताचा कामत यांना दीर्घ अनुभव असून बँकिंग क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. सद्यकाळात ते न्यू डेव्हलपमेंट बँकेचे अध्यक्ष आहेत. ही बँक ब्रिक्स देशांमधील पायाभूत तसेच शाश्वत विकासाच्या प्रकल्पांसाठी निधीचा पुरवठा करते.
नीति आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनाही मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. मोदी सरकार राजकारणाशी जोडले गेलेल्या लोकांसह तंत्रज्ञान विषयक तज्ञांनाही मंत्रिमंडळात सामील करू पाहत आहे. माजी वाणिज्य तसेच उद्योग आणि रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
राज्यसभा खासदार स्वप्न दासगुप्ता यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांना मनुष्यबळ विकास मंत्रालयात राज्यमंत्री केले जाऊ शकते. प्रमुख केंद्रीय विद्यापीठे मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अंतर्गत येतात. अनेक विद्यापीठे सध्या वादात सापडली आहेत.
कामत हे आयसीआयसीआय बँकेचे बिगर कार्यकारी अध्यक्ष राहिले आहेत. मॅकेनिकल अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केल्यावर कामत यांनी आयआयएम अहमदाबादमधून एमबीएची पदवी प्राप्त केली होती. 67 वर्षीय कामत यांनी 1971 मध्ये स्वतःच्या कारकीर्दीचा प्रारंभ आयसीआयसीआय फायनान्शियल इन्स्टीटय़ूशनमधून केली होती. याच संस्थेने पुढील काळात आयसीआयसीआय बँकेची स्थापना केली होती. 2002 मध्ये बँक आणि या संस्थेचे विलीनीकरण करण्यात आले होते. 1998 मध्ये कामत यांनी आयसीआयसीआय बँकेचा राजीनामा देत आशियाई विकास बँकेत प्रवेश केला होता. दीर्घकाळ या संस्थेत कार्यरत राहिल्यावर कामत 1996 मध्ये आयसीआयसीआयचे व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून परतले होते.