वृत्तसंस्था/ ओडेन्स, डेन्मार्क
भारताच्या किदाम्बी श्रीकांतने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविताना कॅनडाच्या जेसन अँथनी हो शुईचा पराभव केला.
पाचव्या मानांकित श्रीकांतने केवळ 33 मिनिटांच्या खेळात हो शुईचा 21-15, 21-14 असा पराभव केला. ‘दोन्ही गेम्स 11-11 अशा स्थितीपर्यंत अत्यंत चुरशीचे झाले. पण त्यानंतर फॉर्म कायम ठेवत मी यश मिळवू शकलो, याचा मला आनंद वाटतो. त्याचे फटके परतावून लावताना मला सावध खेळ करावा लागला,’ असे श्रीकांत म्हणाला. त्याची पुढील लढत जागतिक द्वितीय मानांकित चिनी तैपेईच्या चौ तिएन चेनविरुद्ध होण्याची शक्यता आहे. चेनची लढत आयर्लंडच्या एन्ग्युयेनशी होणार आहे. चेनबद्दल बोलताना श्रीकांत म्हणाला की, ‘गेल्या काही वर्षांत त्याने चांगले प्रदर्शन केले असून माझी सध्याची स्थिती त्याच्याविरुद्ध खेळताना जोखता येणार आहे. ही स्पर्धा खेळण्यामागे तोच उद्देश आहे. त्याला आक्रमण व बचाव केव्हा करावा, याची परिपूर्ण जाण असून तो आता प्रगल्भ खेळाडू झाला आहे. अव्वल चारमधील खेळाडूंविरुद्ध खेळताना आपला नेहमीच कस लागत असतो,’ असेही तो म्हणाला. भारताचे शुभंकर डे व अजय जयराम यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला आहे.