17 व्या स्मृतिदिन कार्यक्रमात जी. एल. अष्टेकर यांना मान्यवरांकडून आदरांजली : आठवणींना दिला उजाळा
वार्ताहर /सांबरा
गेल्या 17 वर्षात आम्हाला जी. एल. अष्टेकर यांची कमतरता दिसून आली. बहुभाषिकांमधून आमदार म्हणून निवडून येण्याचा मान त्यांनाच मिळाला होता, असे प्रतिपादन माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी केले.
ते सोमवारी मुतगे येथे जी. एल. अष्टेकर (पाटील) प्रति÷ान यांच्यावतीने आयोजित माजी आमदार कै. जी. एल. अष्टेकर यांच्या 17 व्या स्मृतिदिन कार्यक्रमात बोलत होते.
न्यू इंग्लीश स्कूलच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष आर. वाय. पाटील होते. प्रमुख वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील होते.
प्रारंभी पी. वाय. पाटील यांनी प्रास्ताविक केले. जी. एल. अष्टेकर यांच्या प्रतिमेचे पूजन माजी आमदार मनोहर किणेकर व म. ए. समितीचे सरचिटणीस एम. जी. पाटील यांच्या हस्ते झाले. सर्व संघ-संस्था व हितचिंतकांच्यावतीने पुष्पहार घालून आदरांजली वाहण्यात आली.
माजी आमदार कै. जी. एल. अष्टेकर एक उत्तम व्यापारी, शेतकरी आणि प्रामाणिक व कुशल राजकारणी होते. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा ग्रामीण भागाचा विकास त्यांच्या हातून झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली म. ए. समिती अधिक बळकट व संघटित होती, असे प्रतिपादन माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
ग्रा. पं. अध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले, गावातील विकासकामे आमदार अष्टेकर यांच्या प्रेरणेने करत आहोत. त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव आहे.मराठा को-ऑप. बँकेचे संचालक बाळासाहेब काकतकर म्हणाले, की महाराष्ट्र एकीकरण समितीच्या जडणघडणीत मोलाचा वाटा आमदार जी. एल. अष्टेकर यांचा आहे. त्याचबरोबर मराठा बँकेची उभारणी आणि वाटचाल त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. एस. एन. पाटील म्हणाले, मराठी भाषेला सदोदित पाठीमागे टाकण्याचे काम शासनाने जरी केले असले तरी त्याला उभारी देण्याचे काम आमदार जी. एल. अष्टेकर यांनी केले आहे. ग्राम पंचायतीच्या नूतन सदस्यांनी आमदारांच्या प्रेरणेने विकासकामे करावीत व त्यांचा वसा पुढे घेऊन जा. कार्यक्रमाचे अध्यक्ष आर. वाय. पाटील म्हणाले, जी. एल. अष्टेकर यांनी ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न केले. न्यू इंग्लीश स्कूलच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा आहे. यावेळी तालुका म. ए. युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, मराठा को-ऑप. बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, शामराव पाटील, सुधीर पाटील, किरण पाटील, भाऊराव जाधव, महेश पाटील, माजी सैनिक मनोहर कडेमनी, प्रभाकर पाटील, अमोल पाटील, नारायण कणबरकर, भारता सरोळकर, रेखा अंची, कल्पना अष्टेकर, बाळाराम पाटील, एम. वाय. केदार, एस. आर. तिरविर यांच्यासह गावातील सर्व संघ-संस्था, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन अष्टेकर प्रति÷ानचे सुनील अष्टेकर यांनी केले होते. सूत्रसंचालन बी. बी. कोंडसकोप्प यांनी तर आभार डी. एम. शितोळे यांनी मानले.