ऑनलाइन टीम / पुणे :
आपल्या कलेच्या जोरावर संगीत क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध जलतरंग वादक कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे (सातारा) यांच्या २३ व्या स्मृतीच्या निमित्ताने ‘कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे स्मृती समारोहा’चे आयोजन १९ जानेवारी २०२० रोजी सायं ६ वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहात करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्ध जलतरंग वादक मिलिंद तुळाणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
या समारोहाचे हे २३ वे वर्ष असून यावर्षी पं. राजन मिश्रा व पं. साजन मिश्रा आपल्या गायकीने कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे यांना मानवंदना देणार आहेत. यावेळी त्यांना पं. अरविंद थत्ते संवादिनीवर तर पं. अरविंद आझाद हे तबल्यावर साथसंगत करणार आहेत. यावेळी मिलिंद तुळाणकर यांचे ‘जलतरंग’ वादन होणार आहे. त्यांना तबल्यावर गणेश तानवडे तर पखवाजवर गणेश पापळ हे साथसंगत करणार आहेत.
यावेळी बोलताना मिलिंद तुळाणकर म्हणाले की, आमचे आजोबा कै. पं. शंकर विष्णू कान्हेरे यांच्या स्मरणार्थ या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. आजोबांकडून आलेला हा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील असतो. या महोत्सवात तालयोगी पं. सुरेश तळवलकर, पं. रामदास पळसुले, पं. अरविंदकुमार आझाद, पं. नयन घोष (तबला), रघुनंदन पणशीकर, देवकी पंडीत (गायन), उस्ताद तौफिक कुरेशी (जेंबे), अमर ओक (बासरीवादक), मार्क प्लॅनेल्स (जलतरंग वादक, स्पेन, मिलिंद तुळाणकर यांचे शिष्य), उस्ताद उस्मान खान (सितार), पं. अरविंद थत्ते, मिलिंद कुलकर्णी (संवादिनी), पं. राजेंद्र गंगाणी (कथक) आदी कलाकारांनी आपली कला या महोत्सवात सादर केली आहे.
या कार्यक्रमासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) अतुलचंद्र कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असल्याने सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक मिलिंद तुळाणकर यांनी केले.