ऑनलाईन टीम / मुंबई :
कॉमेडियन कपिल शर्माला मुंबई क्राईम ब्रांचने समन्स बजावले आहेत आणि चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कपिल शर्माला कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्या डीसी डिझाईन फसवणुकीच्या प्रकरणात जबाब नोंदववण्यासाठी बोलवण्यात आले आहे.
पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, कपिल शर्मा यांनी कार डिझायनर दिलीप छाब्रिया यांच्याविरूद्ध फसवणुकीचा आरोप केला आहे. आता या प्रकरणात कपिल शर्माला साक्षीदार म्हणून त्याचा जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आले आहे.
दरम्यान, 29 डिसेंबर रोजी संध्याकाळी डीसी डिझाईन प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक दिलीप छाब्रिया यांना अंधेरीच्या एमआयडीसीमधून गुन्हे शाखेच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआययू) अटक केली होती.
मुंबई गुन्हे शाखेच्या माहितीनुसार, 18 डिसेंबर रोजी त्यांच्या टीमला अशी गुप्त माहिती मिळाली की एकाच इंजिन व चेसिस क्रमांकाची दोन किंवा अधिक वाहने आहेत आणि त्यातील एक कुलाबातील ताज हॉटेल जवळ येणार आहे. यानंतर गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि डीसी कार थांबवली आणि कारच्या कागदपत्रांची तपासणी केली.
दरम्यान, कपिल शर्माने शाहरुख खानसारखी वॅनिटी व्हॅन तयार करण्यासाठी दिलीप छाब्रियांशी संपर्क साधला होता. कपिलने दिपील छाब्रिया यांना निम्मे पैसेही दिले पण वॅनिटी व्हॅन मिळाली नाही. याबाबत कपिलकडे चौकशी केली जाऊ शकते.