प्रतिनिधी/ पुणे
कॉसमॉस बँकेने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. संचालक मंडळाबरोबरच बँकेच्या कर्मचाऱयांनी आपत्कालीन काळात मदतीचा हात नेहमीच पुढे केला आहे. कोरोनामुळे महाराष्ट्राबरोबर संपूर्ण देशही संकटात आहे. त्यामुळे कॉसमॉस बँक संचालक मंडळ, बँकेचे अधिकारी आणि कर्मचाऱयांनी मुख्यमंत्री साहाय्य निधीला तब्बल 35 लाख तर पंतप्रधान साहाय्य निधीला 20 लाखाची भरघोस मदत केली आहे.
पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे या निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. बँकेचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे, बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, कर्मचारी प्रतिनिधी उमेश दातार यांनी हा धनादेश दिला आहे. सध्याची परिस्थिती ही अत्यंत धोकादायक आहे. या कोरोनामुळे संपूर्ण जगच थांबले आहे. त्यामुळे आपला देश आणि राज्यही संकटात आहे. या संकटकाळी मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. हे कर्तव्य जाणूनच कॉसमॉस बँकने 55 लाखांचा निधी दिला आहे.
सध्याची परिस्थिती गंभीर असल्यामुळे कॉसमॉस बँक, पुणे व पिंपरी-चिंचवड शहरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी मोबाईल एटीएम व्हॅनदेखील सुरू केली आहे. कोरोनाच्या संकटकाळी बँकेने जी मदत केली आहे, तसेच जे पाऊल उचलले आहे याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.