प्रतिनिधी /पणजी
अनेक महिन्यानंतर राज्यातील कॅसिनो पुन्हा एकदा सुरू झाल्यामुळे पणजीतील मांडवीचा किनारा गजबजू गेला आहे. तेथे पर्यटकांची वर्दळ पुन्हा सुरू झाली आहे. तथापि ते कॅसिनो 50 टक्के क्षमतेने चालतात की नाही? हे तपासून पहाणारी कोणतीच यंत्रणा कार्यरत नसल्याचे दिसून आले.
गोव्यातील पर्यटनाशी संबंधित बहुतेक सर्व उद्योग सुरू झाले होते परंतु कॉसिनो, स्पा-मसाज पार्लर, नाईट क्लब यांना मात्र बंदी होती. तेथील कार्यकारी व मालक, चालक वर्गाने ते उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्याची मागणी लावून धरली होती. शेवटी सरकारला कॅसिनो व इतर उद्योगांसमोर हात टेकावे लागले आणि सरकारने कोरोनाचे नियम पाळून ते उद्योग 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यास मान्यता दिली.
त्यानुसार कॅसिनो चालू झाले असून इतके दिवस शांत असलेली मांडवी किनारी वसलेली कॅसिनो कार्यालये कालपासून गजबजू लागली आहेत. मांडवी नदीतही कॅसिनोचा गजबजाट सुरू झाला असून आता रात्री अपरात्री देखील मांडवी किनारा गजबजणार आहे. संचारबंदी वाढवली नसल्याने ती संपल्यात जमा आहे.