कोरोना योध्दा म्हणून ग्रामपंचायतीचा तालुक्यात प्रथम क्रमांक
वार्ताहर/ संगमेश्वर
संगमेश्वर जवळच्या डोंगराळ भागात वसलेल्या छोटय़ाशा कोंडअसुर्डे ग्रामपंचायतीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभावी उपाययोजना राबविली आहे. ग्रामपंचायतीच्या ग्रामकृती दलाने ग्रामस्थांच्या मदतीने कोविड 19 चा प्रादूर्भाव रोखीत संगमेश्वर तालुक्यात प्रथम येण्याचा मान पटकाविला आहे. कोविड 19चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महत्वाची योगदान लाभलेल्या कोविड योध्दाचा ग्रामपंचायतीच्यावतीने कोंड असुर्डे ग्रामपंचायतीमध्ये गुरुवार दि. 10 सप्टेंबर रोजी सकाळी 11वा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
कोंड असुर्डे ग्रामपंचायतीने सलग 5वर्षे 100 टक्के पाणी पट्टी वसुली केलेली आहे. ग्रामपंचायतीने निर्मल ग्रामपंचायतीमध्ये सहभाग घेत गाव निर्मल करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सन 2008 मध्ये केंद्र शासनाचा निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे. ग्रामपंचायतीने प्रत्येक घरामध्ये वैयक्तिक शौचालयासाठी ग्रामस्थांना प्रोत्साहित केले आहे. त्यामुळे सन 2015ते 2016मध्ये हंगणदारी मुक्त पहिला संगमेश्वर तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत असे घोषित करण्यात आले. शेतीच्या वापरासाठी पाणी संधारण उपाययोजना राबविण्यात आली. यामध्ये सन 2015 ते सन 2016 आणि सन 2019 ते 2020 पर्यंत महात्मा फुले संधारण अभियानांतर्गत सर्वाधिक वनराई व कच्चे बंधारे लोकसहभागातून बांधले आहेत. सन 2019 ते 2020 अंतर्गत तालुकास्तरीय स्मार्ट ग्रामपंचायती पुरस्कारासाठी पात्र ठरली आहे. कोविड 2019 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायतीच्या ग्रामकृतीदलाने व ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल तालुकास्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. तसेच ई ग्रामपंचायत पेपरलेस होण्याचा मान मिळाला आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानातमध्ये सन 2019 ते 2020 ग्रामपंचायत सहभाग घेतलेला आहे. असे विविध पुरस्कार प्राप्त कोंडअसुर्डे ग्रामपंचायतीचे सरपंच सदानंद करदोडे, उपसरपंच श्रीराम किरण शिंदे यांनी यावर्षी जिल्हास्तरीय योध्दा सन्मान पुरस्कारमध्ये आपला सहभाग दर्शविला. कोरोनाच्या युध्दामध्ये श्रीदेव राधाकृष्ण मंडळ, कोंड असुर्डे,हितवर्धक कमिटी बौध्दवाडी,ग्रामविकास मंडळ धाडवेवाडी,महालक्ष्मी विकास मंडळ जांभूळवाडी यांनी महत्वाचे योगदान दिले. तसेच ग्रामसेवक अर्जुन गंगाराम जाधव यांनी निटनेटके आयोजन केले. त्यामुळे संगमेश्वर तालुक्यात ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक मिळाला आहे. गुरुवारी कोरोना योध्दाचा सत्कार होणार असून आमदार शेखर निकम,जि.प. अध्यक्ष रोहन बने,जि.प. सदस्या रचना महाडिक,पंचायत समिती सभापती सुजित महाडिक,निधी सनगरे,तहसिलदार सुहास थोरात,आरोग्य अधिकारी रायभोळे आदि मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. सोशल डिस्टंट आणि नियमांचे पालन करुन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.