जीन्स पँटचा तुकडा, हाडे, जबडा आढळून आल्याने खळबळ
प्रतिनिधी /बेळगाव
कोंडसकोप्प, ता. बेळगाव जवळील हनुमंतवारी परिसरात मानवी कवटी व हाडे आढळून आली आहेत. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे. परिसरातील नागरिक या ठिकाणी जाण्यास घाबरत आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून कवटी व काही वस्तू येथेच पडून आहेत.
कोंडसकोप्पपासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर गवताळ भागात मानवी कवटी आढळून आली आहे. जेथे कवटी व हाडे पडली आहेत, त्याच परिसरातील गवत जळाल्याचे दिसून येत आहे. ऍसिड ओतून एखाद्याचा खून केला असावा, असा संशय बळावत चालला आहे. या परिसरात जाणाऱया अनेक शेतकऱयांनी मानवी कवटी पाहिली आहे.
मृतदेह जाळल्याचा संशय
‘तरुण भारत’ला त्याची छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत. कवटीपासून जवळच मानवी हाडे पडली आहेत. त्या हाडांच्या जवळच जबडा, जीन्स पँटचा तुकडा पडला आहे. यावरून एखाद्या तरुणाचा खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी या परिसरात आणून ऍसिडने मृतदेह जाळल्याचा संशय स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे.
के. के. कोप्प व कोंडसकोप्पच्या मध्ये ही हनुमंतवारीची जमीन आहे. या परिसरात जाणाऱया शेतकऱयांच्या नजरेला कवटी व हाडे पडली असून काही जणांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली आहे. मात्र, पोलिसांनी अद्याप ते अवशेष ताब्यात घेतलेले नाहीत. पूर्णपणे निर्जन प्रदेशात कवटी व हाडे आढळून आली आहेत.
विधिविज्ञान प्रयोगशाळेची मदत घ्यावी लागणार
मानवी कवटी, हाडे ताब्यात घेऊन वैज्ञानिक पृथक्करण केल्यानंतरच याविषयीचा उलगडा होणार आहे. ही कवटी व हाडे स्त्राrची आहेत की पुरुषाची? त्याचे नेमके वय किती आहे? किती दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाला आहे? याची माहिती मिळविण्यासाठी विधिविज्ञान प्रयोगशाळेची मदत घ्यावी लागणार आहे. त्यानंतरच मानवी कवटीचे गूढ उकलणार आहे.