साडेचारशे जीवंत कोंबड्या आणि 20 पोती कोंबडी खाद्याची परस्पर विक्री
प्रतिनिधी / मिरज
पोल्ट्रीमधील कोंबड्या आणि कोंबडीचे खाद्य कंपनीत पोहच करतो, असे सांगून तिघा मित्रांनी सुमारे साडेचारशे जीवंत कोंबड्या आणि 20 पोती कोंबडी खाद्याची परस्पर विक्री करुन पोल्ट्रीचालक विजय बाळासो जाधव (वय 31) यांची सुमारे दीड लाख रुपयांची फसवणूक केली. तालुक्यातील संतोषवाडी येथे हा प्रकार घडला. याबाबत जाधव यांनी मिरज ग्रामीण पोलिसात धाव घेऊन तिघा कोंबडीचोर मित्रांच्या विरोधात फसवणुकीची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी नितीन मनोहर चौगुले (रा. मालगांव वेस, मिरज) आणि अन्य दोघा अनोळखी इसमांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर तिघांनी आयशीयर टेंपोत साडेचारशे कोंबड्या आणि 20 पोती कोंबडी खाद्य भरुन कंपनीत पोहच करतो, असे म्हणून निघून गेले. त्यानंतर कोंबड्या आणि खाद्याची पोती कंपनीत पोहचलीच नाहीत. दोन दिवसानंतर चौकशी केली असता, सदर तिघांनी सर्व जीवंत कोंबड्या आणि 20 पोती खाद्याची परस्पर विक्री करुन सुमारे एक लाख, 28 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी तिघा केंबडीचोर मित्राविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.