चेन्नईसमवेत 45 ठिकाणी कारवाई
वृत्तसंस्था /चेन्नई
तामिळनाडूच्या कोईम्बतूर येथील कार स्फोट प्रकरणातील टेरर फंडिंगवरून एनआयएच्या पथकाने गुरुवारी राज्यात अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएच्या पथकाने राज्याची राजधानी चेन्नईसमवेत 45 ठिकाणी ही कारवाई केली आहे. यात कोईम्बतूरमधील 21 ठिकाणांचा समावेश आहे.
एनआयएच्या अधिकाऱयांनी राज्य पोलिसांसोबत मिळून गुरुवारी पहाटे कोट्टामेडु, पोनविझा नगर, रथिनापुरी आणि उक्कदम यासारख्या ठिकाणी संशयितांच्या ठिकाणांवर धाड टाकत दस्तऐवज ताब्यात घेतले आहेत.
23 ऑक्टोबर रोजी कोईम्बतूर येथील मंदिरासमोर कारमध्ये स्फोट झाला होता. या स्फोटात जमीशा मुबीनचा मृत्यू झाला होता. मुबीनची एनआयए अधिकाऱयांनी 2019 मध्ये चौकशी केली होती.
स्फोटक सामग्री हस्तगत
उक्कदम येथील मुबीनच्या घरातून पोलिसांनी स्फोटक सामग्री जप्त केली होती. पोलिसांनी 75 किलोग्रॅम पोटॅशियम नायट्रेट, ऍल्युमिनिय पावडर आणि सल्फर जप्त केले होते. गृह मंत्रालयाच्या काउंटर टेररिजम अँड काउंटर रॅडिकलायजेशन विभागाकडून चौकशीचा आदेश दिल्यावर एनआयएने गुन्हा नोंदविला होता. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याकडून या प्रकरणाची चौकशी एनआयएद्वारे करविण्याची शिफारस करण्यात आली होती.
आरोपींवर युएपीए
पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 6 हून अधिक जणांना अटक केली आहे. या आरोपींच्या विरोधात युएपीए अंतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. जमीशा मुबीनचे हे साथीदार असल्याचे मानले जातेय.