जोहान्सबर्गच्या भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत पंचाचा मान
राजू चव्हाण/ खेड
दक्षिण आफ्रिकन भूमीतील जोहान्सबर्ग येथे 3 जानेवारीपासून भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात मूळचे तालुक्यातील शिव गावचे सुपुत्र असलेले व सद्यस्थितीत दक्षिण आफ्रिकेत वास्तव्यास असलेल्या अल्लाहुद्दीन पालेकर यांना कसोटी क्रिकेट पंच म्हणून काम करण्याचा मान मिळाला. यानिमित्ताने पुन्हा कोकणचा डंका आंतरराष्ट्रीय पातळीवर पिटवत खेडचे नाव सातासमुद्रापार पोहचवण्याची किमयाही पुन्हा त्यांनी साधली आहे.
अल्लाहुद्दीन पालेकर हे लहानपणापासूनच दक्षिण आफ्रिकेतच वास्तव्यास आहेत. क्रिकेट खेळाची त्यांना विशेष आवड असून त्यांचे वडीलही उत्कृष्ट क्रिकेटर आहेत. याशिवाय दक्षिण आफ्रिकेत क्रिकेट पंच म्हणूनही काम पाहत आहेत. वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवत दक्षिण आफ्रिकेतच त्यांनी क्रिकेट क्षेत्रात पाय रोवले. लहानपणापासून क्रिकेट खेळात त्यांनी विक्रमांवर विक्रम देखील रचले आहेत. अनेक क्रिकेट सामन्यांमध्ये उत्कृष्ट खेळाबद्दल पुरस्कारही प्राप्त झाले आहेत.
क्रिकेट सामन्यात पंच म्हणून कामास प्रारंभ करण्यापूर्वी ते प्रथम श्रेणीतील क्रिकेट सामने खेळत होते. वेस्टर्न प्रोव्हिन्स व टायटन्स संघाची त्यांनी प्रतिनिधीत्व केले आहे. या संघाकडून फॅक डू प्लेसिस, एबी डिव्हिलियर्स, डेल स्टेन या खेळाडूंबरोबर खेळण्याचा मान मिळाला होता. यापूर्वीही फेब्रुवारी 2018मध्ये झालेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय पातळीवरील भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यात अल्लाहुद्दीन पालेकर पंच म्हणून काम पाहताना टी.व्ही.वरील क्रिकेट चॅनलवर दिसताच शिव गावासह तालुकावासीयांना अत्यानंद झाला होता.
44 वर्षीय पालेकर गेल्या 15 वर्षापासून क्रिकेट पंच म्हणून कार्यरत आहेत. 2015मध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई व मध्यप्रदेश यांच्यातील सामन्यातही ते पंच होते. क्रिकेटचे माहेरघर असलेल्या मुंबईत त्यांना पंच म्हणून काम करण्याची मिळालेली संधी भूषणावहच ठरली होती. यानंतर चेन्नईत तामिळनाडू व मध्यप्रदेश यांच्यातील सामन्यातही त्यांनी पंच म्हणून काम पाहिले आहे. आजवर टी-20 च्या 29 सामन्यांमध्ये तर वन-डे च्या 3 सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले आहे. यामध्ये भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व अन्य एका क्रिकेट सामन्याचा समावेश आहे. गावासह कोकणचा झेंडा दक्षिण आफ्रिकेत फडकवणारे अल्लाहुद्दीन पालेकर यांना जोहान्सबर्ग येथे भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यात पुन्हा पंचाचा मान मिळाल्याबद्दल साऱयांनाच अभिमान वाटत आहे. 6 वर्षापूर्वी ते आपल्या मूळगावी एका लग्न सोहळय़ासाठी शिव येथे आले होते. त्यानंतर मात्र शिव येथील ग्रामस्थांनी सोमवारपासून सुरू असलेल्या कसोटी सामन्यात प्रत्यक्ष टी.व्ही.वरच क्रिकेट पंच म्हणून काम पाहत असताना पाहून साऱयांचाच ऊर भरून येत आहे.
कसोटीत पंचाची संधी माझ्यासाठी अभिमानाचा क्षण
जोहान्सबर्ग येथे सुरू असलेल्या भारत विरूद्ध दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यात पंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. माझे वडील माझ्यासाठी प्रेरणास्थान असून कुटुंबियांकडून मिळत असलेल्या भक्कम पाठिंबामुळेच आपली वाटचाल सुरू आहे. पंच म्हणून काम करताना खूपच संयम बाळगावा लागतो, असेही अल्लाहुद्दीन पालेकर यांनी सांगितले.
अती आनंद
अल्लाहुद्दीन पालेकर यांनी गावासह कोकणाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील क्रिकेट सामन्यात त्यांना क्रिकेट पंच म्हणून प्रत्यक्ष पाहताना अतिव आनंद होत असल्याची प्रतिक्रिया शिव येथील सामाजिक कार्यकर्ते महामूद पालेकर यांनी व्यक्त केली.